E20 Petrol Survey Pudhari
राष्ट्रीय

E20 Petrol Survey: E20 पेट्रोलवर धक्कादायक सर्व्हे; मायलेज घटलं, दुरुस्तीचा खर्चही वाढला, 65 टक्क्यांपेक्षा जास्त लोक विरोधात

E20 Petrol Survey: E20 पेट्रोल लागू झाल्यानंतर 67 टक्के वाहनधारकांनी वाहनाचे मायलेज 10% पेक्षा जास्त घटल्याचा दावा सर्वेक्षणात केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

E20 Petrol Survey: देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल अनिवार्य झाल्यानंतर वाहनधारकांकडून विविध तक्रारी समोर येत आहेत. अनेकांनी मायलेज कमी झाल्याचा तसेच इंजिन आणि इंधन प्रणालीतील दुरुस्तीचा खर्च वाढल्याचा दावा केला आहे. सरकारने यापूर्वी E20 मुळे मायलेजवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, मात्र इंजिनला कोणतेही नुकसान होत नसल्याचे स्पष्ट केले होते. एप्रिल 2025 पासून E20 पेट्रोलचा वापर अनिवार्य झाल्यानंतर ग्राहकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत असं लोकल सर्कल्स (LocalCircles) या संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

मायलेज कमी झाल्याचा दावा

2023 पूर्वी खरेदी केलेल्या पेट्रोल वाहनांच्या मालकांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 67 टक्के लोकांनी 2025 च्या सुरुवातीपासून त्यांच्या वाहनाचे मायलेज 10 टक्क्यांपेक्षा जास्त घटल्याचे सांगितले. या प्रश्नाला एकूण 22,541 वाहनधारकांनी प्रतिसाद दिला.

दुरुस्तीच्या खर्चातही वाढ झाल्याची तक्रार

सर्वेक्षणात वाहनांच्या इंजिन, फ्यूल लाइन, फ्यूल टँक, कार्ब्युरेटर, फ्यूल पंप आणि इंजेक्टर यांसारख्या भागांमध्ये जास्त झीज किंवा दुरुस्तीची गरज भासली का, असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर 22,641 जणांनी उत्तर दिले. त्यापैकी 45 टक्के वाहनधारकांनी वाहनांच्या विविध भागांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त झीज झाली किंवा दुरुस्तीची गरज असल्याचं सांगितलं.

सरकारची भूमिका काय?

केंद्र सरकारने यापूर्वी स्पष्ट केले की, E20 पेट्रोलमुळे मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते, कारण इथेनॉलची ऊर्जा क्षमता पारंपरिक पेट्रोलपेक्षा कमी असते. मात्र, E20 सुसंगत (E20-compatible) असणाऱ्या वाहनांमध्ये इंजिनचे नुकसान होत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

तज्ज्ञांचे मत

सर्वजीत घनश्याम सरोज हे गेली 15 वर्ष पुण्यात वाहन दुरुस्तीचं काम करत आहेत. त्यांच्या मते, जुनी पेट्रोल वाहने आणि नवीन E20-रेडी वाहने यांच्यात तांत्रिक फरक आहे. त्यामुळे जुनी वाहने वापरणाऱ्या ग्राहकांना मायलेज कमी मिळतं आणि वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढतो. सध्या E20 पेट्रोलमुळे जुनी वाहने खराब होण्याचं प्रमाण वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT