e20 petrol mileage controversy nitin gadkari car owners authorised dealers
पुढारी ऑनलाईन : E20 पेट्रोलमुळे कारचे मायलेज कमी होत असल्याच्या दाव्यांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, सामान्य वाहनमालक स्वतः कारचे मायलेज अचूकपणे मोजू शकत नाही. यासाठी अधिकृत डीलरशिपमध्ये विशेष मशीन उपलब्ध असते, ज्याद्वारेच योग्य मायलेजची तपासणी करता येते.
20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधन म्हणजेच E20 पेट्रोल आणि त्याचा वाहनांच्या मायलेजवर होणारा परिणाम याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केले.
मुलाखतीदरम्यान पत्रकाराने सांगितले की, त्यांच्याकडे 2023 मॉडेलची E20-सुसंगत कार आहे. पूर्वी शहरात त्या कारचे मायलेज सुमारे 11 किमी प्रति लिटर होते; मात्र आता ते कमी होऊन सुमारे 7 किमी प्रति लिटर इतके झाले आहे.
यावर गडकरी यांनी पत्रकाराला विचारले की, मायलेज कसे मोजले? पत्रकाराने उत्तर दिले की, कारच्या डॅशबोर्डवर दिसणाऱ्या मायलेजच्या आकड्यांवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला.
त्यावर गडकरी म्हणाले, "तुम्ही असाल किंवा मी, आपण स्वतः मायलेजची अचूक तपासणी करू शकत नाही. कारचे खरे मायलेज केवळ कंपनीच्या अधिकृत डीलरशिपकडे असलेल्या विशेष मशीनद्वारेच तपासले जाऊ शकते."
दरम्यान, केंद्र सरकारनेही अलीकडेच मान्य केले आहे की, काही वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरल्यास इंधन कार्यक्षमतेत (फ्यूल इकॉनॉमी) 3 ते 5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलबाबत जारी केलेल्या दस्तऐवजात ही बाब नमूद केली आहे. मात्र, केवळ मायलेजच्या आधारे वाहनाच्या एकूण कार्यक्षमतेचे मूल्यांकन करू नये, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून देशभरात E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य केली आहे.