DY Chandrachud on residence
नवी दिल्ली : भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सरकारी बंगल्यातून बाहेर पडण्यास झालेल्या विलंबावर भाष्य करत स्पष्ट केलं की, यामागे कोणताही उद्देश नव्हता. त्यांच्या कुटुंबातील आरोग्यविषयक गरजांमुळे स्थलांतराची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असल्याचं त्यांनी सांगितलं.
न्या. चंद्रचूड सध्या दिल्लीतील 5, कृष्णा मेनन मार्ग येथील टाईप-8 प्रकारच्या सरकारी बंगल्यात राहतात. त्यांनी सांगितलं की त्यांच्या दोन मुली – प्रियंका आणि माही – या "नेमालाईन मायोपथी" नावाच्या दुर्मिळ जनुकीय आजाराने ग्रस्त आहेत.
दोघींना त्यांनी दत्तक घेतलं असून, त्यांच्यासाठी घरातच एक लहान ICU सेटअप तयार केला आहे. या मुली 16 आणि 14 वर्षांच्या असून, व्हीलचेअरवर अवलंबून आहेत. त्यामुळे घरात बदल करणे, जसे की बाथरूमचे दरवाजे रुंद करणे, हे आवश्यक आहे.
बार अॅण्ड बेंच या वेबसाईटशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, "आमचं सामान आणि फर्निचर पॅक करून तयार ठेवलं आहे. केवळ काही रोजच्या वापरातील वस्तू उरल्या आहेत, त्या लवकरच हलवण्यात येतील. अजून 10-15 दिवसात आम्ही बंगला रिकामा करू."
नवीन घरामध्ये काम सुरु, भाड्याने घर मिळण्यात अडचण
त्यांना तीन मूर्ती मार्गावर नवीन सरकारी निवासस्थान देण्यात आलं आहे, परंतु ते घर गेल्या दोन वर्षांपासून रिकामं असून त्यात भरपूर काम बाकी होतं. ठेकेदाराने जूनपर्यंत काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी भाड्याने घरी राहण्याचाही प्रयत्न केला, परंतु इतक्या कमी कालावधीसाठी कोणीही घर द्यायला तयार नव्हतं.
चंद्रचूड नोव्हेंबर 2024 मध्ये सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर 8 महिने झाले असून, सुप्रीम कोर्टाने यावर नाराजी व्यक्त करत नागरी विकास मंत्रालयाला बंगला रिक्त करण्याबाबत पत्र लिहिलं आहे.
सुरुवातीला त्यांना टाईप-7 बंगला दिला होता, परंतु त्यांनी सुप्रीम कोर्ट प्रशासनाकडे 30 एप्रिल 2025 पर्यंत जुन्या बंगल्यात राहण्याची विनंती केली होती.
चंद्रचूड यांनी सांगितलं की, "शिमल्यामध्ये असताना माझ्या मुलीची प्रकृती अचानक बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास झाला. तिला विमानातून चंदीगडला नेऊन ICU मध्ये 44 दिवस ठेवावं लागलं. ती अजूनही ट्रेकियोस्टॉमी ट्यूबवर आहे. रात्री अचानक ट्यूब बदलावी लागते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी लागते."
संजय खन्ना व भूषण गवई यांच्याशी संवाद
माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीही त्यांना बंगला वापरण्यास हरकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशीही चंद्रचूड यांनी विनंती केली होती. त्यांनी बाजारभावाने भाडे द्यायची तयारीही दर्शवली.