Ranchi DSP wife dowry case
रांची: हुंड्यासाठी १० दिवस एका खोलीत डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ, मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींवर केला आहे. पीडित महिला ही एका पोलीस उपअधीक्षकांची (DSP) पत्नी असून, तिने याप्रकरणी रांची येथील सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह ११ मार्च २०२६ रोजी पोलीस उपअधीक्षक राम प्रवेश कुमार यांच्याशी झाला होता. लग्नाआधीपासूनच सासरच्या मंडळींकडून महागडी गाडी, २५ लाख रुपयांचे दागिने आणि लग्नाच्या खर्चाची मागणी केली जात होती. पीडितेच्या वडिलांनी सुमारे १२ लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी, २२ ते २५ लाख रुपयांचे दागिने आणि सासऱ्यांच्या खात्यात १० लाख रुपये जमा करून लग्नाचा इतर सर्व खर्च उचलला होता.
लग्नानंतरही पतीने आणि सासरच्या लोकांनी आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली. पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या पतीने बोकारो येथील क्वार्टरवर तिला १० दिवस खोलीत डांबून ठेवून अमानुष मारहाण केली. या छळात तिची सासू आणि इतर नातेवाईकही सहभागी होते. तसेच, नणंदेच्या लग्नासाठी २० ते २५ लाख रुपयांची सोय करण्याचा दबाव तिच्यावर आणला जात होता आणि पैसे न दिल्यास कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली जात होती. पतीच्या एका नातेवाईकाने तिच्या खोलीत लपून बसून अयोग्य वर्तन केल्याचा आरोपही तिने केला आहे.
कशीबशी सासरच्यांच्या तावडीतून सुटका करून पीडिता रांचीच्या सदर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. महिलेच्या शरीरावर गंभीर दुखापतींच्या खूणा आढळल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.