Viral Video:
हैदराबाद: एका भरधाव मर्सिडीज कारने एका वाहनाला धडक दिली, त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला बोनेटवर तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील 'आयटी हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गच्चीबावली परिसरात शनिवारी सकाळी मद्यधुंद कारचालकाने हा थरार घडवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना आयआयआयटी जंक्शनजवळ घडली. या प्रकरणी गुरामपती तरुण (वय २४, रा. नरसिंगी) याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, चालक मद्यधुंद अवस्थेत अतिशय वेगाने आपली लक्झरी कार चालवत होता. त्याने सुरुवातीला एका वाहनाला धडक दिली. यावेळी तिथे तैनात असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, कार थांबवण्याऐवजी आरोपीने वेग वाढवला, ज्यामुळे कॉन्स्टेबल थेट कारच्या बोनेटवर पडला.
आरोपीने कार न थांबवता तशाच अवस्थेत सुमारे एक किलोमीटरपर्यंत गाडी पळवली. अखेर इतर वाहनचालकांनी आणि पोलिसांनी पाठलाग करून कारला अडवले आणि चालकाला ताब्यात घेतले. सुदैवाने, जखमी कॉन्स्टेबलला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.