चंदीगड : वृत्तसंस्था
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) लडाखमधील न्योमा येथे जगातील सर्वात उंचावरील ड्रॉप झोनमध्ये ‘मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम’ची (एमसीपीएस) २२,००० फुटांवरून यशस्वी चाचणी घेतली आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानात पार पडलेल्या या चाचणीमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतीय हवाईदलाने नुकताच न्योमा येथे लढाऊ विमानांच्या संचलनासाठी जगातील सर्वात उंचावरील हवाईतळ सुरू केला आहे. यापूर्वीही न्योमा येथे सैन्य, वाहने आणि युद्धसामग्री पॅरा-ड्रॉप करण्याच्या अनेक मोहिमा पार पडल्या आहेत.
या ताज्या चाचणीदरम्यान जवानांनी २२ हजार फुटांवरून उडी घेतली. त्यानंतर २० हजार फुटांवर पॅराशूट उघडण्यात आले आणि जवानांनी १३,७०० फूट उंचीवर सुरक्षित लँडिंग केले. उणे १५ अंश सेल्सिअस इतक्या गोठवणाऱ्या तापमानात ही थरारक चाचणी पार पडली. ‘डीआरडीओ’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, मुख्य टेस्ट जम्पर विंग कमांडर राहुल झा, एमडब्ल्यूओ आर. जे. सिंग (व्हीएम-जी) आणि एमडब्ल्यूओ विवेक तिवारी यांनी ही यशस्वी उडी पूर्ण केली. अत्यंत उंचीवर आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत या प्रणालीची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि रणनीतिक उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
सर्व उपप्रणाली पूर्णतः स्वदेशी
या चाचणीदरम्यान जवानांनी ‘एमसीपीएस’सोबतच स्वदेशी ‘पॅरा कॉम्प्युटर’, अत्याधुनिक ऑक्सिजन यंत्रणा आणि विशेष जम्पसूटचा वापर केला. ही संपूर्ण प्रणाली आग्रा येथील ‘एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ (एडीआरडीई) आणि बंगळूर येथील ‘डिफेन्स बायोइंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी' (डीईबीईएल) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.
या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये :
नियंत्रित अवतरण : हवेतून खाली उतरण्याचा वेग नियंत्रित ठेवण्याची क्षमता.
अचूक दिशा नियंत्रण : हवेच्या तीव्र प्रवाहातही जवानांना इच्छित दिशेने पॅराशूट वळवणे शक्य.
सुरक्षित लँडिंग : एक्झिटपासून ते ठरवलेल्या ड्रॉप झोनमध्ये सुरक्षित उतरण्यापर्यंत अचूक नेव्हिगेशन.