S. Jaishankar to Europian Union
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर युरोपियन युनियनकडून आलेल्या प्रतिक्रियेवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारताला जागतिक मंचावर अशा देशांची गरज आहे जे भारताच्या बाजूने उभे राहतील, उपदेश करणाऱ्या देशांची नव्हे, असे रोखठोक बोल जयशंकर यांनी सुनावले आहेत.
डॉ. एस. जयशंकर यांनी युरोपियन देशांवर अप्रत्यक्ष टीका करत स्पष्ट केलं की, “जेव्हा भारत जगाकडे पाहतो, तेव्हा आम्ही भागीदार शोधतो, उपदेशक नव्हे. विशेषतः असे उपदेशक, जे परदेशात जाऊन शिकवतात पण स्वतः मात्र त्याच गोष्टींचं पालन करत नाहीत.”
अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात काही जवान हुतात्मा झाले, तर काही जखमी झाले होते.
यानंतर युरोपियन युनियनकडून हल्ल्याचा निषेध करताना काही ‘नैतिक शिकवण’ देणारे संकेत दिले गेले, ज्यामुळे भारतात नाराजी व्यक्त केली जात आहे.
जयशंकर म्हणाले की, “युरोपचा काही भाग अजूनही या समस्येत अडकलेला आहे. काही ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येत आहेत, पण सर्वत्र तसा अनुभव नाही.”
ते पुढे म्हणाले, “युरोप आता वास्तव तपासणीच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. पुढे ते यामधून काय शिकतात आणि कसे बदल करतात हे पाहावे लागेल.
पण जर आपल्याला खऱ्या अर्थाने भागीदारी घडवायची असेल, तर परस्पर समज, संवेदनशीलता आणि जगाच्या कार्यपद्धतीचं भान असणं गरजेचं आहे.”
डॉ. जयशंकर यांची युरोपवरील ही पहिली टीका नाही. याआधी रशियावर घातलेल्या पाश्चिमात्य निर्बंधांदरम्यान भारताने रशियाकडून तेल आयात सुरू ठेवली होती.
त्यावरून प्रश्न उपस्थित होताच त्यांनी म्हटलं होतं, “युरोपने जर आपल्याला आपल्या ऊर्जा गरजांनुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं असेल, तर भारतालाही तेच हक्क असावेत. युरोप आपल्या गरजा प्राधान्याने पाहतो आणि भारतालाही तेच करायचं आहे.”
युरोपच्या समस्या म्हणजेच जागतिक समस्या” ही मानसिकता चुकीची
जयशंकर यांनी म्हटलं होतं की, युरोपने या समजुतीतून बाहेर पडण्याची गरज आहे की, “युरोपच्या समस्या म्हणजेच जगाच्या समस्या असतात, पण जगाच्या समस्या युरोपच्या नाहीत.”