

Israel Airport Missile Attack Air India Flight Diverted
नवी दिल्ली/तेल अवीव्ह: इस्रायलची राजधानी तेल अवीव्ह येथील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मिसाईल हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीहून तेल अवीव्हकडे जाणारे एअर इंडियाचे AI139 हे विमान रविवारी अबुधाबीला वळवण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही असून विमान सुरक्षितपणे उतरले असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. सर्व प्रवासीदेखील सुखरूप आहेत. PTI ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रविवारी सकाळी बेन गुरियन विमानतळाजवळ मिसाईलचा स्फोट झाला. या घटनेच्या सुमारास एअर इंडियाचे AI139 हे विमान जॉर्डनच्या हवाई हद्दीत होते. सुरक्षा धोक्याचा अंदाज घेत, तात्काळ निर्णय घेऊन विमान अबुधाबीला वळवण्यात आले.
Flightradar24.com या फ्लाइट ट्रॅकिंग संकेतस्थळावरील माहितीनुसार, विमान त्या वेळी जॉर्डनच्या हवाई क्षेत्रात होते आणि तेथूनच ते अबुधाबीला वळवण्यात आले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, “4 मे 2025 रोजी दिल्लीहून तेल अवीव्हकडे जाणारे AI139 हे विमान बेन गुरियन विमानतळावर झालेल्या घटनेनंतर अबुधाबीला वळवण्यात आले. विमान सुरक्षितरित्या अबुधाबीमध्ये उतरले असून लवकरच दिल्लीकडे परत येईल.”
यासोबतच, कंपनीने 3 ते 6 मे 2025 या कालावधीतील तेल अवीव्हकडील सर्व उड्डाणे तात्काळ स्थगित केल्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा एकदाच तारीख बदलण्याची सुविधा दिला जाणार आहे.
प्रवाशांसाठी मदत
एअर इंडियाचे स्थानिक कर्मचारी प्रवाशांना पर्यायी व्यवस्था आणि मदत पुरवत आहेत. कंपनीने स्पष्ट केले की, "ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हाच आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे."
इस्रायली पोलिसांनी सांगितले की, येमेनमधून एक क्षेपणास्त्र डागण्यात आले. मिसाईलचा स्फोट विमानतळालगतच्या टर्मिनल 3 जवळील रस्त्यावर झाला. स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून आले आणि प्रवाशांमध्ये घबराट उडाली.
चार जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त इस्रायली वैद्यकीय सेवा मगेन डेव्हिड अडोम यांनी दिले आहे. इस्रायली पोलिस कमांडर याईर हेट्झरोनी यांनी स्फोटाने तयार झालेला मोठा खड्डा प्रसारमाध्यमांना दाखवला.
हल्ल्याची जबाबदारी हुती बंडखोरांनी स्वीकारली असून त्यांनी हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ म्हणाले की, “जो कोणी आमच्यावर हल्ला करेल, त्याला सातपट प्रत्युत्तर दिले जाईल.”