Nitin Gadkari on Ethanol Effect
नवी दिल्ली : इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होते का, असा प्रश्न तुमच्याही मनात असेल, तर सरकारने याचे उत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे देश आणि शेतकरी या दोघांनाही मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
परकीय चलनाची मोठी बचत
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे देशाचा पैसा परदेशात जाण्यापासून वाचला आहे. या निर्णयामुळे सुमारे १.४० लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे. याचा थेट फायदा देशातील शेतकऱ्यांनाही झाला आहे. इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस आणि मका यांसारख्या कच्च्या मालाची गरज असते. या पुरवठ्याच्या बदल्यात शेतकऱ्यांनी सुमारे ४०,००० कोटी रुपये कमावले आहेत.
प्रदूषण कमी करण्यात उपयुक्त
गडकरी यांनी सांगितले की, E20 पेट्रोल (२०% इथेनॉल असलेले पेट्रोल) हे स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होते. तसेच, महागड्या इंधनासाठी इतर देशांवर असलेले आपले अवलंबित्व देखील कमी होते.
वाहनांवर स्टिकर लावावा लागणार
E10 आणि E20 इंधनाच्या मानकांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गडकरी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, वाहन उत्पादकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी कोणते मॉडेल E20 इंधनासाठी अनुकूल आहे, हे सांगावे. ही माहिती वाहनावर स्टिकर लावून स्पष्टपणे दिली जावी. त्यांनी स्पष्ट केले की १ एप्रिल २०२३ पूर्वी विकलेली वाहने E10 नुसार आहेत, तर या तारखेनंतर विकलेली वाहने E20 मानकांचे पालन करतात.
इंजिनवर परिणाम होत नाही : गडकरी
सरकारने E20 इंधनासाठी कठोर सुरक्षा मानके निश्चित केली आहेत. ही मानके बीआयएस (BIS) स्पेसिफिकेशन्स आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्सद्वारे तयार केली गेली आहेत. गडकरी यांनी सांगितले की, अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहन चालण्यास किंवा सुरू होण्यास कोणतीही अडचण येत नाही, असे अहवालातून दिसून आले आहे. वाहनाच्या धातू आणि प्लास्टिकच्या भागांवरही याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही.
जुनी वाहने बदलण्याची गरज नाही
E20 आल्यामुळे जुनी वाहने बंद करावी लागतील किंवा त्यात बदल करावे लागतील का? या प्रश्नावर गडकरी यांनी सांगितले की, याची कोणतीही गरज नाही. एआरएआय, आयओसीएल आणि सियाम यांच्या एका अभ्यासात ही गोष्ट सिद्ध झाली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे होणारी सामान्य झीज नियमित सर्व्हिसिंगद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते. यासाठी कोणत्याही इंजिनमधील बदलाची गरज नाही.
कार्बन उत्सर्जनात घट
इथेनॉल मिश्रणा कार्यक्रमाच्या पर्यावरणावरील परिणामाबद्दलही आकडेवारी सादर करण्यात आली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या कार्यक्रमामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ७९० लाख मेट्रिक टनने घट झाली आहे.' याव्यतिरिक्त, २६० लाख मेट्रिक टनहून अधिक कच्च्या तेलाची जागा इथेनॉलने घेतली आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.