Crime News:
उत्तर प्रदेश: लग्नाला अवघा महिना पूर्ण होत नाही तोच, एक नवविवाहित तरुणी आपल्या डॉक्टर पतीला सोडून कथित प्रियकरासोबत पसार झाली आहे. जाताना तिने घरातील पैसे आणि सोन्याचे दागिनेही सोबत नेल्याचा आरोप पतीने केला आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही खळबळजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. १९ फेब्रुवारी रोजी नरैनी परिसरातील एका तरूणीशी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर महिनाभर सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, २२ मार्च रोजी त्याचे संसाराचे स्वप्न तुटले. पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री एका चारचाकी वाहनातून तीन तरुण आले आणि त्याच्या पत्नीला फूस लावून सोबत घेऊन गेले.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली. ही तरुणी गेल्या दोन वर्षांपासून कॅमेरामन असेलेल्या एका तरुणाच्या संपर्कात होती. तो यापूर्वी डॉक्टरांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात वीडियोग्राफी करण्यासाठी आला होता. तिथूनच त्या दोघांचे पुन्हा बोलणे सुरू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पतीच्या तक्रारीवरून पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक मदतीने आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तिचा शोध घेतला जात आहे. संशयित तरुण हा या कुटुंबाच्या आधीपासूनच परिचयात होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.