Fact Check Pakistan shot down Rafale fighter Jet near LOC Fake
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या मीडियामध्ये आणि सोशल मीडीयावर पाकिस्तानने भारताचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलेल्या बातम्या फिरत आहेत. त्यामुळे खरंच पाकिस्तानने भारताचे लढाऊ विमान पाडले आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यादरम्यान, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) मंगळवारी (दि.२९) या संदर्भात सत्य काय आहे ते सांगितले आहे.
पाकिस्तानच्या सोशल मीडियावर काय दावा केला जातोय?
पाकिस्तान समर्थक अनेक सोशल मीडिया अकाउंट्स काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानने एक भारतीय राफेल लढाऊ विमान पाडले आहे, असा खोटा दावा करत आहेत. PIBने यासंबंधीचे Fact check केले केले आहे. यामधून पाकिस्तान दावा करत असलेली तत्सम कोणतीही घटना भारतात घडली नसल्याचे समोर आले आहे.
'तो' विमानाचा व्हिडिओ महाराष्ट्रातला
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेकमध्ये असे दिसून आले आहे की, पाकिस्तानी सर्मथक सोशल मीडियाने शेअर केलेला व्हिडिओ हा जून २०२४ मध्ये महाराष्ट्रात कोसळलेल्या सुखोई-३०MKI लढाऊ विमानाचा आहे. तो सध्याच्या कोणत्याही घटनेचा नाही. त्यामुळेच PIBने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणारे, ज्याला कोणताही आधार नाही, असे खोटे दावे शेअर करताना सोशल मीडिया युजर्संनी सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला आहे.
भारत- पाकिस्तानमध्ये तणाव
पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दहशतवादी कारवाया घडवणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने चोहोबाजूंनी पाकिस्तानची कोंडी केली आहे. जागतिक स्तरावरील सर्व प्रमुख नेत्यांना मोदींनी फोन करत पाकिस्तानचे काळेकृत्य उघड केले. तसेच सरकारने पाकचे पाणी तर बंद केले. दुसरीकडे पाकिस्तान सैन्यातही दुफळी माजली आहे. पाक सरकारने सुट्ट्या रद्द केल्याने हजारो सैनिकांनी राजीनामा दिल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.