Whisky Rum  File Photo
राष्ट्रीय

Diageo Whisky Rum formula change: तुमच्या आवडत्या व्हिस्की आणि रमची चव बदलणार; 'हे' लोकप्रिय ब्रँड्स फॉर्मुल्यात करणार बदल

जगातील प्रसिद्ध मद्य उत्पादक कंपनीने भारतातील आपल्या लोकप्रिय व्हिस्की आणि रमच्या मूळ फॉर्मुल्यात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Diageo Whisky Rum formula change

नवी दिल्ली: रॉयल चॅलेंज, अँटिक्विटी ब्लू आणि मॅकडॉवेल्स नंबर १ या लोकप्रिय मद्यब्रँड्सच्या चवीत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. जगप्रसिद्ध मद्य उत्पादक कंपनी डियाजियोने भारतातील आपल्या काही लोकप्रिय व्हिस्की आणि रमच्या फॉर्म्युलामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारवाईनंतर कंपनीने अतिरिक्त फ्लेवरिंगचा वापर न करण्याचे मान्य केले आहे.

ब्रँड्सवर बंदी घालण्याचे कारण काय?

अन्न सुरक्षा नियंत्रकाने (FSSAI) अलिकडेच भारतातील मद्य उद्योगावर कडक कारवाई करत काही राज्यांत डियाजियोसह इतर कंपन्यांच्या ब्रँड्सवर बंदी घातली होती. या ड्रिंक्सच्या लेबलवर चुकीची माहिती दिली जात असल्याचे आणि नियमांचे उल्लंघन करून वरून कृत्रिम फ्लेवर्स मिसळले जात असल्याचा ठपका ठेवण्‍यात आला होता.

आता कंपनी काय करणार आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, डियाजियोने आपल्या ड्रिंक्समध्ये असे अतिरिक्त फ्लेवर्स न मिसळण्याची अट मान्य केली आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर अन्न सुरक्षा नियंत्रकही ही बंदी उठवण्यास तयार झाले आहे. सुरुवातीला ही बंदी दोन राज्यांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांवर लादण्यात आली होती. मध्य प्रदेश येथे तयार होणारी 'अँटीक्वटी ब्लू' आणि 'रॉयल चॅलेंज' व्हिस्की. तसेच महाराष्ट्रात तयार होणारी 'मॅकडोवेल्स नंबर १ सेलिब्रेशन मॅच्युअर्ड XXX रम'.

विशेष म्हणजे, कंपनी आता फक्त बंदी घातलेल्या राज्यांतच नव्हे, तर संपूर्ण देशभरात या सर्व ब्रँड्सचा फॉर्म्युला बदलणार आहे.

नवीन फॉर्म्युला येईपर्यंत काय होईल?

भारतात 'रॉयल ​​चॅलेंज' ब्रँडला प्रचंड मागणी आहे. सध्या रॉयल चॅलेंजच्या बाटलीच्या मागील लेबलवर डीमिनरलाइज्ड वॉटर, ग्रेन न्यूट्रल स्पिरिट, स्कॉच, परवानगी असलेला नैसर्गिक रंग आणि नेचर-आयडेंटिकल फ्लेवरिंग पदार्थांचा उल्लेख केला जातो. नवीन फॉर्म्युला बाजारात येईपर्यंत कंपनीला आणखी एक महत्त्वाचा नियम पाळावा लागणार आहे. संक्रमणाच्या काळात बाटलीच्या समोरील लेबलवर कोणता फ्लेवर वापरण्यात आला आहे, याची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक असेल.

प्लास्टिक पॅकेजिंगबाबत कठोर उपाययोजना

फ्लेवरिंगच्या वादासोबतच डियाजियोला प्लास्टिक पॅकेजिंगबाबतही कारवाईला सामोरे जावे लागले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी डियाजियोच्या मद्याच्या सुमारे १८ हजार पेट्या जप्त केल्या होत्या. या बाटल्यांवर सुरक्षितपणे पुनर्वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर करण्यात आल्याचे दर्शवणारे आवश्यक चिन्ह नसल्याचा आरोप करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT