बंगळूर : अनैसर्गिक मृत्यूमुळे देशात चर्चेत आलेले धर्मस्थळ प्रकरणाची आता एका अज्ञात व्यक्तीने रचलेले कुभांड असल्याचा संशय आहे. ती अज्ञात व्यक्ती चामराजनगरमधील चिन्नप्पा आहे. बनावट कथा रचून पोलिस व सरकारची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली एसआयटीने त्याला अटक केली आहे. एसआयटी प्रमुख प्रणव मोहंती यांच्या उपस्थित त्याला ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदाराच्या जबाबात तफावत आढळली असून त्याने जाणूनबुजून पोलिसांची दिशाभूल केली असावी, असा संशय आहे. अनैसर्गिक मृत्यूसंदर्भात धर्मस्थळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सरकारने पुढील तपासासाठी एसआयटी स्थापन केली. त्यानुसार एसआयटी अधिकार्यांनी तक्रारदाराने दर्शविलेल्या 17 ठिकाणी उत्खनन केले. मात्र, त्यांना कोणतेही महत्त्वाचे अवशेष सापडले नाहीत. त्यामुळे, उत्खननाचे काम थांबवून त्या अज्ञात व्यक्तीची चौकशी सुरू केली.
एसआयटीने तक्रारदाराचे नातेवाईक व मित्रांची चौकशी केली. तेव्हा त्याची पत्नी व भावांनी तक्रारदाराने पैशासाठी धर्मस्थळचे नाव कलंकित करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. त्यामुळे, शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटे पाचपर्यंत त्याची चौकशी करण्यात आली असून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी तामिळनाडूत होतो.
तेव्हा धर्मस्थळ मंदिराला विरोध करणार्या एका टोळीने माझ्याशी संपर्क साधून पैसे देऊ केले. तुम्ही या प्रकरणाचे मुख्य असून या प्रकरणाला एक वेगळे वळण द्याल. त्यामुळे, तुम्हाला कोणत्याही कारणास्तव घाबरण्याची गरज नसून चौकशीनंतर अनेक तक्रारदार पुढे येतील. त्यामुळे, सर्व चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. सुरुवातीला मला बंगळूरमध्ये थोडे प्रशिक्षण देण्यात आले होते. पोलिसांनी विचारले तर कसे उत्तर द्यायचे हे मला सांगण्यात आले. नंतर मी सूत्रधारांनी सांगितल्याप्रमाणे वागायचो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माहिती दिली असल्याचे तक्रारदाराने कबूल केले आहे.