आतिशी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. AAP
राष्ट्रीय

Delhi water crisis | आतिशी यांची प्रकृती चिंताजनक! उपोषण थांबवले

दीपक दि. भांदिगरे

दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी हरियाणा सरकारच्या विरोधात सुरु केलेले त्यांचे बेमुदत उपोषण थांबवले आहे. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने आतिशी यांनी उपोषण थांबवल्याची माहिती आम आदमी पक्षाने दिली आहे.

हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरू होते. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ३६ पर्यंत खाली आली आहे. अतिशी यांच्यावर लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

अतिशी यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मध्यरात्री ४३ पर्यंत खाली आले होते आणि पहाटे ते ३ वाजता ते ३६ पर्यंत खाली आले, असे सांगत आपने आतिशी यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेत असतानाचे फोटो X वर शेअर केले होते. "आतिशी यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ३६ पर्यंत खाली आले. त्यामुळे त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले," असे आप नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

आतिशी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार

आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असून दिल्लीच्या जलसंकटाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला जाईल. "आतिशी ५ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना उपोषण सोडण्यास सांगितले होते. काल रात्री त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी ३६ पर्यंत खाली आली होती. डॉक्टरांनी त्यांना तातडीने ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता. अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यांना पहाटे ३.३० - ४ वाजता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्या अजूनही आयसीयूमध्येच आहेत. दिल्लीला पाणी सोडण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहित आहोत. त्यांचे बेमुदत उपोषण थांबवले जात आहे, पण आम्ही संसदेत आवाज उठवू...," असे संजय सिंह म्हणाले.

दिल्लीत जलसंकट

दिल्लीत तीव्र पाणी टंचाईची समस्या आहे. असे असताना हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रतिदिन १०० दशलक्ष गॅलन (MGD) पाणी सोडत नसल्याचा आतिशी यांचा आरोप आहे. दिल्लीतील पाणी टंचाईमुळे २८ लाख लोकांची गैरसोय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT