Delhi AC blast file photo
राष्ट्रीय

Delhi AC blast: दिल्लीत अग्नितांडव! विवेक विहारमध्ये AC चा स्फोट; झोपेतच ९ जण जळून खाक

दिल्लीतील विवेक विहार परिसरात आज पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.

मोहन कारंडे

Delhi AC blast

नवी दिल्ली: दिल्लीतील विवेक विहार परिसरात आज पहाटे एका इमारतीला भीषण आग लागली. AC चा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्दैवी घटनेत ९ जणांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून १२ हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

पहाटेच्या वेळी काळाचा घाला

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३:४७ च्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली. ही आग विवेक विहारमधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली आणि काही वेळातच तिने तिसऱ्या मजल्यालाही कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्यातून आणि धुराच्या लोटातून मार्ग काढत बचावकार्य सुरू करण्यात आले.

गाढ झोपेत असताना 'बेड'वरच जळून खाक

दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एसीचा स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली. तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गच्चीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने गच्चीचा दरवाजा बंद असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे धुराने गुदमरून आणि आगीने होरपळून अनेकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावर चार जणांचे मृतदेह आढळले असून, काही जणांच्या मृतदेहाची गाढ झोपेत असताना 'बेड'वरच राख झाली.

कुलिंग ऑपरेशन सुरू

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या घटनास्थळी 'कुलिंग ऑपरेशन' सुरू आहे. इमारतीचा काही भाग अद्यापही तापलेला असल्याने शोधमोहीम राबवताना अडथळे येत आहेत. या आगीचे नेमके कारण काय आणि इमारतीत सुरक्षेचे नियम पाळले होते का, याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दलाचे प्रशासन करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT