Delhi Restaurant Fire: दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौज रानी भागात बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. एका रेस्टॉरंटमध्ये लागलेली आग काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीत पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. वृत्तांनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. काही जण अजूनही इमारतीत अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने बचावकार्य सुरू आहे.
बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग वेगाने पसरताच रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या 11 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या तब्बल 10 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. दाट धूर आणि आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन जवानांनी अनेक तास अथक प्रयत्न केले. आतापर्यंत 37 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारताना दिसत आहेत. धुराने वेढलेल्या परिसरातील आरडाओरडा आणि बचावासाठी सुरू असलेली धडपड या घटनेची भीषणता अधोरेखित करत आहे.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. बचावकार्य सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि तपास यंत्रणांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटसह इतर तांत्रिक कारणांचा विचार केला जात असला, तरी अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.
या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार सतीश उपाध्याय यांनी सांगितले की, सकाळी सुमारे 9 वाजता ही घटना घडली. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मोठे सहकार्य केले. दिल्ली पोलिस, अग्निशमन दल आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
एसडीएम जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, कॉल मिळताच डीडीएमए यंत्रणा सक्रिय करण्यात आली. संबंधित इमारतीच्या तळमजल्यावर रेस्टॉरंट सुरू होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून त्याचा सखोल तपास सुरू आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे दिल्लीत हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.