नवी दिल्ली ः दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, स्वप्ने भंगली आहेत. प्रियजनांचे चेहरे पाहून नातेवाईक हंबरडे फोडत आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. मंगळवारी दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयातील शवागारातून मृतदेह बाहेर काढताना नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या प्रियजनांना पाहून ते ढसाढसा रडले. दिल्लीतील श्रीनिवासपुरी येथील रहिवासी अमर कटारिया यांच्या आई आणि पत्नी निराधार आहेत. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या पंकजचा मृतदेह लोकनायक रुग्णालयाच्या शवागारात ओळखण्यात आला. त्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. पंकजचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या ओमानचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. ओमानला पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. कुटुंबीयांचे कसेतरी सांत्वन करण्यात आले. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या जुम्मनचा मृतदेह मौलाना आझाद स्मशानभूमीत आणण्यात आला. कुटुंबाने जुम्मनची ओळख त्याच्या कपड्यांवरून पटवली. जुम्मनचा पाय आणि डोक्याचा अर्धा भाग गायब झाला आहे. जुम्मनचे काका इद्रिस म्हणाले की, जुम्मनची पत्नी अपंग आहे आणि त्याला तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. जुम्मन 35 वर्षांचा होता आणि तो ई-रिक्षाचालक म्हणून काम करत होता. तो शास्त्री पार्कमध्ये राहात होता. दरम्यान, आझाद स्मशानभूमीबाहेर कुटुंबातील सदस्य निराधार होते. त्याची बहीण आणि पत्नी तनुजा या धाय मोकलून रडत होत्या.
सोमवारी संध्याकाळी ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. स्फोटाचे आवाज कमी होताच रस्त्याने जाणाऱ्यांना मानवी शरीराचे तुकडे दिसले. पुढच्याच क्षणी संपूर्ण परिसर आरडाओरड्याने भरून गेला.
काही लोकांनी त्यांच्या खासगी वाहनांमधून जखमींना मदत केली. घटनेनंतर लगेचच रस्त्यावर धुराचे लोट पसरले आणि अनेक वाहनांना आग लागली. स्फोटानंतर काही काळ लोक काय घडले हे समजू शकले नाहीत. दरम्यान, कण्हण्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्यांनी माणुसकी दाखवली आणि सर्वांना मदत करण्यास सुरुवात केली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. स्फोटात अडकलेल्यांनी एकमेकांना मदत करण्यास आणि सावरण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन विभागाने मदतीचा हात पुढे केला. काही वेळातच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जळत्या वाहनांवर पाणी फवारून आग विझविण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. सर्व वाहतूक रोखली आणि गर्दीला मागे हटवण्यासाठी सुरक्षा घेरा तयार केला. जवळच उभ्या असलेल्या अनेक गाड्या आगीत जळून खाक झाल्या होत्या, ज्वाळा उंच उंच जात होत्या. हे दृश्य पाहून अनेकांनी श्वास रोखून धरले.
काही मिनिटांतच रुग्णवाहिका रांगेत उभ्या राहिल्या. स्फोटानंतर लगेचच बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू झाले. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आणि पोलिसांच्या मदतीने ई-रिक्षा आणि इतर खासगी वाहनांनी जखमींना रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच रस्त्यावर रुग्णवाहिका आल्या. पाच ते सात मिनिटांतच जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचार सुरू झाले. दरम्यान, रस्त्यावर फक्त रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सायरन वाजवत धावताना दिसत होत्या. अनेक जखमींना स्ट्रेचरवरून रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू झाले.