Delhi Red Fort blast
दिल्ली: लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला आहे. स्फोटाच्या ठिकाणाहून पोलिसांनी फक्त लष्कराकडे असणारे ९ एमएम तीन काडतुसे जप्त केली आहेत. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक नागरिक जखमी झाले होते.
जप्त केलेल्या काडतुसांपैकी दोन जिवंत गोळ्या आहेत, तर तिसरे रिकामे शेल आहे. या शोधामुळे तपास यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. ९ एमएम गोळ्या साधारणपणे देशातील सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून वापरल्या जातात. त्यामुळे घटनास्थळी लष्कराच्या वापराचे काडतुसे सापडणे अत्यंत गंभीर मानले जात आहे.
या संदर्भात माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटाच्या जागेवर कोणतेही पिस्तूल किंवा इतर शस्त्राचे भाग आढळले नाहीत. त्यामुळे ही काडतूसे घटनास्थळी नेमकी कशी आणि कुठून आली, याबाबत तपास यंत्रणा गोंधळलेल्या आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गोळ्याची तपासणी केली, परंतु त्यांच्याकडील कोणतीही गोळी किंवा काडतुस कमी नव्हते. त्यामुळे त्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक १ जवळ झालेला हा स्फोट उच्च-दर्जाच्या स्फोटक सामग्रीमुळे घडला असावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. Forensic पथकांना घटनास्थळावरून एक नमुना मिळाला आहे, जो सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अमोनियम नायट्रेट पेक्षाही अधिक शक्तिशाली असल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. काडतुसे, जिवंत गोळ्या आणि स्फोटकांचे अवशेष यासह ४० हून अधिक पुरावे घटनास्थळावरून गोळा केले आहेत.