Delhi Blast Al Falah University:
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाचा तपासानं आता वेग पकडला आहे. नुकतेच फरीदाबादमधील अल- फलाह विद्यापीठावर सक्तवसुली संचलनालयानं छापे टाकले होते. तसंच या विद्यापीठाच्या कुलगुरूंना देखील अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत असून फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठातून किमान १० लोकं बेपत्ता आहेत. ही १० लोकं एकतर या विद्यापीठात काम करत होते किंवा विद्यार्थी होते. याबाबतची माहिती एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार या १० लोकांचे फोन स्विच ऑफ आहेत. जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये पोलिसांनी विद्यापीठाशी संबंधित छापेमारी केल्यापासूनच हे लोक बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र याबाबत आताच कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. तपास यंत्रणांनी बेपत्ता लोकं हे त्यात टेरर डॉक्टर मॉड्युलचे भाग असू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे.
सूत्रांनी आज दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-महोम्मद ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटाच्या मागं असू शकते. त्यांनी नुकतेच आत्मघातकी हल्ल्यांसाठी फंडिग करण्याचे आवाहन देखील केलं होत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाल किल्ला स्फोटाचा तपास करत असताना डिजीटल माध्यमातून जैशने फंडिगचं आवाहन केलं होतं. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानी अॅप SadaPay चा वापर केला होता. या हल्ल्यात महिलांची मुख्य भूमिका असल्याता देखील संशय तपास यंत्रणांना आहे.
जैश-ए-मोहम्मद यांची महिला शाखा आहे. दहशतवादी मसूद अझरची बहीण सादिया सध्या या महिला शाखेचं नेतृत्व करत आहे. ही शाखा ऑपरेशन सिंदूरनंतर तयार करण्यात आली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्करानं पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा भागलपूर येथील कॅम्प उद्ध्वस्त केला होता.
दरम्यान, लाल किल्ला परिसरातील स्फोटातील मुख्य संशयित डॉक्टर शाहिना सईद जी मॅडम सर्जन या टोपण नावानं ओळखली जाते तिच्याकडे या हल्ल्यासाठीचे पैसे गोळा करण्याची जबाबदारी असावी असा अंदाज तपास यंत्रणांना आहे. ही जैश-ए-मोहम्मद मुमिनातशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
दिल्ली स्फोटातील i20 गाडी चालवत असलेला डॉक्टर उमर मोहम्मद हा स्फोटात मारला गेला आहे. तर अल-फलाह वैद्यकीय महाविद्यालयातील इतर नऊजण ज्यात तीन डॉक्टरांचा समावेश आहे त्यांना अटक करण्यात आली आहे.