Delhi News
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज होत असतानाच, दिल्ली पोलिसांनी संपूर्ण राजधानीत मोठी मोहीम राबवली. सार्वजनिक सुरक्षितता आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांकडून 'ऑपरेशन आघात ३.०' राबवण्यात आले. यामध्ये शेकडो आरोपींना अटक केली असून बेकायदेशीर शस्त्रे आणि चोरीचा माल जप्त केला आहे.
दक्षिण-पूर्व दिल्ली पोलिसांनी 'ऑपरेशन आघात ३.०' अंतर्गत ही तीव्र मोहीम राबवली. संघटित आणि सराईत गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी जिल्ह्यातील संवेदनशील भागात छापे टाकण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान आर्म्स ॲक्ट, एक्साईज ॲक्ट, एनडीपीएस ॲक्ट आणि जुगार कायद्याच्या विविध कलमांखाली २८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी ५०४ लोकांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध घेतलेल्या विशेष निर्णयाचा भाग म्हणून ११६ नोंदणीकृत गुन्हेगारांना देखील ताब्यात घेतले आहे.
या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये २१ देशी बनावटीची पिस्तूलं, २० जिवंत काडतुसे आणि २७ चाकूंचा समावेश आहे. पोलिसांनी अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारूचा साठाही जप्त केला आहे, जो नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आणण्याचा प्रयत्न होता.
मोठ्या प्रमाणात चोरीच्या वस्तूही हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, या कारवाईत हिसकावून घेतलेले, लुटलेले किंवा हरवल्याची नोंद असलेले ३१० मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी जिल्ह्याभरातील तपासणीदरम्यान २३१ दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.
एकूण १,३०६ लोकांना प्रतिबंधात्मक उपायांखाली ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी रात्रभर गस्त घालत स्थानिक गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापे टाकले.