Onion Protest
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा प्रश्नावर संसद परिसरात आंदोलन करण्यात आले. कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव, महाराष्ट्रात कांद्याला न मिळणारे अनुदान अशा विविध विषयांवर हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, अरविंद सावंत, बजरंग सोनवणे, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. या आंदोलनाच्या वेळी खासदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी सुखी झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांचे नुकसानीबद्दल देवळा तालुक्यातील एका शेतकऱ्याने बनवलेले प्रतिकात्मक चित्र यावेळी खासदारांनी दाखवले.
या आंदोलनाबाबत ‘पुढारी’शी बोलताना नाशिकमधील दिंडोरी लोकसभा क्षेत्राचे खासदार भास्कर भगरे म्हणाले की, कांद्याला अनुदान दिले पाहिजे आणि हमीभावही दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. कांद्याचा उत्पादन खर्च निघत नाही. यासंदर्भात आम्ही कृषिमंत्र्यांनाही भेटलो होतो. नाफेड आणि एनसीसीएफमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना कांद्यासाठी अनुदान दिले जात असेल तर महाराष्ट्र अनुदान का दिले जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
खासदार निलेश लंके म्हणाले की, महाराष्ट्र हे शेती करणारे राज्य आहे. त्याच राज्यात शेतकऱ्यांवर जीवन संपवण्याची वेळ आली आहे. कांद्याचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. शेतकरी जगाचा अन्नदाता आहे, शेतकऱ्य़ांना न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणे हे आमचे काम आहे, असेही ते म्हणाले.
खासदार राजाभाऊ वाझे म्हणाले की, कांद्याबाबत सरकारचे धोरण बरोबर नाही. जागतिक बाजारात दरवर्षी कांदा जातो मात्र सरकारद्वारे निर्यात कधीही बंद केली जाते. निर्यात धोरण बदलल्याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. शेतकऱ्यांना सवलती दिल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. त्यामुळे जिथून हा निर्णय होतो त्याठिकाणी आम्ही आंदोलन केले. जर इथे योग्य निर्णय झाला नाही तर आम्हाला शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असेही ते म्हणाले.