AI medical advice risk
नवी दिल्ली: वैद्यकीय उपचारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आंधळेपणाने विश्वास ठेवणे एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. AI चा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय स्वतःहून HIV प्रतिबंधक औषधे घेणाऱ्या एका व्यक्तीला अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या रिअॅक्शनचा सामना करावा लागत आहे. त्याला 'स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम' हा दुर्मिळ आणि जीवघेणा आजार झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
HIV ची लागण होण्याची शक्यता असल्यास (उदा. असुरक्षित संबंध किंवा सुया शेअर करणे) संसर्ग रोखण्यासाठी 'पोस्ट-एक्सपोजर' औषधे घेतली जातात. ही औषधे संभाव्य संपर्कापासून ७२ तासांच्या आत सुरू करणे आवश्यक असते. संबंधित व्यक्तीचा एका 'हाय-रिस्क' व्यक्तीशी लैंगिक संपर्क आला होता. त्यानंतर HIV संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, याची माहिती त्याने एका AI प्लॅटफॉर्मवर शोधली. AI ने दिलेल्या सल्ल्यानुसार, त्याने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता स्थानिक औषध विक्रेत्याकडून 'पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस' (PEP) औषधांचा २८ दिवसांचा कोर्स खरेदी केला.
७ दिवस औषधे घेतल्यावर या व्यक्तीच्या शरीरावर गंभीर पुरळ आणि फोड येऊ लागले. प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती या रुग्णाला 'स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम' झाल्याचे निष्पन्न झाले. ही औषधांची एक अत्यंत घातक रिअॅक्शन असून, यामध्ये रुग्णाची त्वचा आणि अंतर्गत अवयवांच्या थरांचे प्रचंड नुकसान होते.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, "या रुग्णाने घेतलेली औषधे आता नवीन प्रोटोकॉलनुसार वापरली जात नाहीत. तरीही त्याला ती मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध झाली, हे धक्कादायक आहे." रुग्णाला झालेला 'स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम' हा त्वचा आणि श्लेष्मल त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो, ज्यासाठी आयसीयूमध्ये उपचारांची गरज असते. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, HIV प्रतिबंधक औषधे केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, काही चाचण्यांनंतरच दिली जातात. स्वतःच्या मनाने ही औषधे घेतल्यास अवयव निकामी होण्यासारखे धोके संभवतात.
या घटनेमुळे औषध विक्रीच्या नियमावलीतील त्रुटी आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी AI प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉक्टरांनी असा इशारा दिला आहे की, AI सामान्य माहिती देऊ शकते, परंतु ते अनुभवी डॉक्टरांच्या निर्णयाची जागा घेऊ शकत नाही. आरोग्यविषयक हस्तक्षेपांसाठी ऑनलाइन AI प्लॅटफॉर्मच्या वापरावर निर्बंध आणण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.