Accident file photo
राष्ट्रीय

Accident: "बाबा, मी घरी येतोय..." वडिलांशी फोनवर बोलत असतानाच ट्रकने चिरडले, दोन भावांचा मृत्यू

आयपीएल सामना पाहून घरी परतताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

Delhi Accident

नवी दिल्ली: आयपीएलचा सामना पाहून घरी जात असताना दोन भावांवर काळाने घाला घातला. दिल्लीतील अशोक रोड परिसरात एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने १४ वर्षीय मुलासह त्याच्या २० वर्षीय चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. हृदयद्रावक गोष्ट म्हणजे, अपघाताच्या काही सेकंद आधी हा मुलगा फोनवरून आपल्या वडिलांशी बोलत होता. "बाबा, मी घरी येतोय," हे त्याचे शेवटचे शब्द ठरले.

अभाव भाटिया (वय १४) आणि त्याचा चुलत भाऊ यज्ञ भाटिया (वय २०) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी ते दोघे दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना संपल्यानंतर दोघेही दुचाकीवरून घरी परतत होते. रात्री १०.३० च्या सुमारास अशोक रोडवरून जात असताना अभावने वडील सुमित यांना फोन केला आणि आपण लवकरच घरी पोहोचत असल्याचे सांगितले. फोन सुरू असतानाच पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक बसताच अभावच्या हातातील फोन निसटला. काही वेळाने एका अनोळखी व्यक्तीने तो फोन उचलला आणि अपघात झाल्याचे वडिलांना सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अभाव हा १० वीत शिकत होता, तर यज्ञ स्वामी विवेकानंद विद्यापीठात बी.एस्सी.चा विद्यार्थी होता.

हेल्मेट नसल्याने गंभीर दुखापत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. "ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला," अशी माहिती त्यांच्या काकांनी दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धडक इतकी भीषण होती की दोघेही दुचाकीसह रस्त्यावर जोरात आपटले गेले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT