पुढारी ऑनलाईन डेस्क : देशद्रोही भाषण प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने शरजील इमाम याला जामीन मंजूर केला आहे. जानेवारी २०२० पासून कोठडीत असल्याने त्याने वैधानिक जामीन मागितला होता. दिल्ली दंगलीच्या मोठ्या कटाच्या प्रकरणातही तो आरोपी आहे. जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याच्यावर २०२० चे दंगली प्रकरण (2020 riots case) आणि बेकायदेशीर कारवायांत सहभाग असल्याचा आरोप आहे.
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला. दिल्लीच्या दंगलीदरम्यान दिल्लीच्या जामिया परिसरात आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी शरजील इमामला देशद्रोह आणि यूएपीए प्रकरणी अटक करण्यात आली होती.
इमामला ट्रायल कोर्टाने जामीन नाकारला होता. ट्रायल कोर्टाच्या आदेशाला त्याने आव्हान दिले होते. आपण दोषी ठरल्यास सुनावल्या जाणाऱ्या कमाल शिक्षेपैकी अर्ध्याहून अधिक शिक्षा भोगली असूनही ट्रायल कोर्टाने जामीन नाकारल्याचा दावा त्याने केला. सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, इमामने १३ डिसेंबर २०१९ रोजी जामिया मिलिया इस्लामिया येथे आणि १६ डिसेंबर २०१९ रोजी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषणे केली होती. त्याने आसाम आणि ईशान्येचा उर्वरित भाग देशापासून तोडण्याची धमकी दिली होती.
इमाम याच्या विरुद्ध दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सुरुवातीला देशद्रोही भाषणे केल्याच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला यूएपीए (बेकायदा कृत्यांविरोधी प्रतिबंध कायदा) चे कलम १३ जोडले गेले होते. इमाम २८ जानेवारी २०२० पासून कोठडीत आहे.
इमामने ट्रायल कोर्टासमोर युक्तिवाद केला होता की तो चार वर्षांपासून कोठडीत आहे आणि यूएपीएच्या कलम १३ अंतर्गत गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त सात वर्षे शिक्षा आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम ४३६-A अन्वये, एखाद्या व्यक्तीने गुन्ह्यासाठी असलेल्या कमाल शिक्षेच्या अर्ध्याहून अधिक शिक्षा भोगली असल्यास त्याची कोठडीतून सुटका केली जाऊ शकते. ट्रायल कोर्टाने १७ फेब्रुवारी रोजी इमामला जामीन नाकारला होता.
हे ही वाचा :