Saurabh Das, Abhijit Deepake, Ashutosh Ranka File Photo
राष्ट्रीय

CJP protest: एक वर्ष शांततेचा भंग नको, जंतर-मंतरवर जाण्यासही बंदी; अभिजीत, सौरव आणि आशुतोष यांची कोणत्या अटींवर सुटका?

'सीजेपी'चे प्रमुख अभिजित दीपके व त्यांचे सहकारी सौरव दास, आशुतोष रांका यांची काही अटींवर न्यायालयाने सुटका केली आहे.

मोहन कारंडे

CJP Delhi protest

नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतर-मंतर येथे शनिवारी नियोजित असलेल्या आंदोलनापूर्वी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत अटक करण्यात आली होती; मात्र, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर आज (दि. ११) त्यांची सुटका करण्यात आली. CJP च्या कायदेशीर विभागाच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी सांगितले की, एका वर्षाच्या कालावधीत शांतता भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) फोडलेल्या डरकाळीने शनिवारी राजधानी दिल्ली अक्षरशः हादरली. या आंदोलनाच्या निमित्ताने राजधानीच्या रस्त्यांवर संघर्ष दिसून आला. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच आंदोलक व त्यांच्या नेत्यांची धरपकड करीत शेकडो जणांना ताब्यात घेतले. 'सीजेपी'चे प्रमुख अभिजित दीपके व त्यांचे सहकारी सौरव दास, आशुतोष रांका यांना शनिवारी दिल्लीत दाखल होताच विमानातच ताब्यात घेतले होते.

आज पोलिसांनी अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. एका वर्षाच्या कालावधीसाठी शांतता राखण्याची हमी म्हणून ५०,००० रुपयांचा जामीन बंधपत्र सादर करण्यात आला, त्यानंतर न्यायालयाने त्यांची सुटका केली. रत्ना सिंग यांनी 'एक्स'वर पोस्ट करत सांगितले की, "कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने अभिजीत, सौरव आणि आशुतोष यांची सुटका केली आहे."

शनिवारी आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करत असताना अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले. ज्यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा समावेश होता.

CJP ने आजही जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या निर्धार केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली असून, पोलीस आणि निमलष्करी दलाचे ३०,००० हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरावृत्ती' प्रक्रियेतील कथित अनियमिततेवरून CJP आणि विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT