Delhi CM Rekha Gupta Death Threat Delhi Political News
नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी परिसरातील गाझियाबाद पोलिस नियंत्रण कक्षाला (पीसीआर) धमकीचा फोन आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गाझियाबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी रात्री ११:३० वाजता ‘डायल ११२’ हेल्पलाइनवर पीसीआरला धमकीचा फोन आला होता. पोलिसांनी धमकी देणाऱ्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याने फोन काही वेळातच बंद झाला. घटनेनंतर, दिल्ली पोलिसांना माहिती कळवण्यात आली आहे. अधिक तपशील मिळविण्यासाठी सक्रियपणे तपास करत आहोत, असे पोलिस उपायुक्त (डीसीपी) धवल जयस्वाल यांनी सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना धमक्या मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला. फोन करणाऱ्याची ओळख आणि स्थान शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
कोतवाली येथील सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) रितेश त्रिपाठी यांनी सांगितले की, संशयितांवर आणि अनेक ठिकाणांवर पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जाईल आणि या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.