दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  (File phto)
राष्ट्रीय

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा नवीन चेहरा ठरला, आतिशींच्या नावावर शिक्कामोर्तब

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आज मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Arvind Kejriwal Resignation Update) देतील. त्यापूर्वी नवीन मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या आमदारांची आज सकाळी ११.३० वाजता बैठक झाली. त्यात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मंत्री आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत ठेवला. यामुळे आतिशी ह्या आता दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरतील. याआधी काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या.

AAP विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आतिशी यांची निवड

केजरीवाल यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण असावा? याविषयी आप नेते, सर्व मंत्र्यांसोबत सोमवारी समोरासमोर चर्चा केली. प्रत्येकाशी ‘वन टू वन’ चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य नावावर या बैठकीत मते आजमावून घेण्यात आली. त्यानंतर आज आतिशी यांची दिल्ली आप (AAP) विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीच्या मंत्री आतिशी, गोपाल राय, सौरभ भारद्वाज आणि कैलाश गहलोत यांची नावे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती.

केजरीवाल का देत आहेत राजीनामा?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मद्यधोरण गैरवहार प्रकरणात तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दुसऱ्यांदा जामीन दिला. त्यांच्यावर आरोप झाल्याच्या सुरुवातीपासून भाजपसह दिल्ली काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. केजरीवाल मात्र राजीनामा न देण्यावर ठाम होते. तुरुंगातून सरकार चालवून दाखवू, असेही त्यांनी आपल्या विरोधकांना ठणकावून सांगितले होते. दरम्यान, १३ सप्टेंबरला केजरीवाल यांना जामीन मिळाला. रविवार, १५ सप्टेंबरला आपण पुढच्या दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यांच्या या घोषणाकडे राजकीय वर्तुळात अनेक अर्थांनी बघितले जाते. केजरीवाल यांना पुन्हा एकदा पहिल्या निवडणुकीप्रमाणे सहानुभूती मिळवून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मला सत्ता महत्त्वाची नसून लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे, लोकांची मते हेच विश्वासाचे प्रमाणपत्र, असा संदेश अरविंद केजरीवाल स्वतःच्या राजीनाम्यातून देण्याची शक्यता आहे. कारण लोकांनी म्हटल्याशिवाय आपण पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

कोण आहेत आतिशी?

आतिशी ह्या पंजाबी राजपूत कुटुंबातील आहेत. त्यांचा जन्म दिल्लीत झाला होता. त्यांचे वडील दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. आतिशी यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले आहे. आतिशी ह्या पहिल्यांदा २०२० मधील विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या. त्याआधी त्यांनी २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांनी त्यांचा ४.७७ लाख मतांनी पराभव केला होता. त्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानी राहिल्या होत्या. आतिशी ह्या केजरीवाल यांच्या विश्वासातील मानल्या जातात. त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनात संघटनेत सक्रिय राहिल्या होत्या. त्यांच्याकडे सध्या आप सरकारमधील सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आहे. जेव्हा केजरीवाल तुरुंगात होते; तेव्हा त्यांनी पक्षापासून ते सरकारच्या निर्णयांची जबाबदारी सांभाळली. आतिशी पहिल्यांदा २०२० मध्ये कालकाजी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार धर्मवीर सिंह यांचा ११ हजार ३९३ मतांनी पराभव केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT