Delhi blast case :
नवी दिल्ली: दिल्ली दहशतवादी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह आज (दि. १ डिसेंबर) आठ ठिकाणी छापे टाकले. पथकाने संशयित आरोपी जसीर बिलाल वानच्या घराची झडती घेतली आहे. एकाचवेळी अनेक पथकांनी आठ ठिकाणी कारवाई केल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
जसीर बिलाल वानी, ज्याला दानिश म्हणूनही ओळखतात, हा १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी एक मानला जातो. तो पदवीधर आहे. एनआयएच्या मते, वानीने पुलवामातील एका डॉक्टर आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या आत्मघाती हल्लेखोर नबी याच्यासोबत काम केले असल्याचा संशय आहे.
वानी हा स्फोटकाच्या तंत्रज्ञानाचा जाणकार होता. त्याने ड्रोनसह गर्दीच्या ठिकाणी वापरता येतील असे लहान बॉम्ब बसवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे स्फोटकाचे डिझाइन हे दहशतवादी संघटना हमास आणि आयसिस सारखे होते. वानी आणि नबी याची भेट मागील वर्षी झाली. यानंतर वानीला जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील होणार होता; पण नबीने त्याला आत्मघाती हल्लेखोर व्हायला प्रवृत्त केले. यानंतर तो नबीला तांत्रिक मदत करत राहिला. त्याला अटक तेव्हा झाली, जेव्हा या प्रकरणातील आणखी एक मुख्य साथीदार अमीर रशीद अली याच्याही मुसक्या आवळल्या गेल्या होत्या. याच अमीर रशीद अलीच्या नावावर स्फोटकांसाठी वापरण्यात आलेल्या कार होती. अलीने नबीसाठी घर आणि इतर मदत उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.