Traffic Congestion Relief Delhi
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता सीमेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर दिला जात आहे. दिल्लीच्या प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यांवर मल्टी लेन फ्री फ्लो (एमएलएफएफ) टोल यंत्रणा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे टोल भरण्यासाठी वाहनांना थांबण्याची गरज राहणार नाही. परिणामी, टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी होऊन वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी देखील मदत होणार आहे. दरम्यान, दिल्लीतील गाजीपूर सीमेवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर दिल्ली महानगरपालिका (एमसीडी), दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून ही यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दिल्लीच्या प्रवेशद्वारांवरील सर्व १५४ टोल पॉइंट्सवर ही प्रणाली कार्यान्वित करण्याची योजना आहे. सध्या विविध ठिकाणी यंत्रणा उभारणीचे काम सुरू असून, काही ठिकाणी ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
सध्या टोलनाक्यांवर वाहनांना थांबावे लागते. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहनांचे इंजिन सुरू ठेवून बराच वेळ थांबावे लागत असल्याने इंधनाचा वापर वाढतो आणि प्रदूषणातही भर पडते. एमएलएफएफ यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर वाहनांना न थांबता टोल नाका पार करता येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग कायम राखण्यास मदत होईल.
या प्रणालीमध्ये आधुनिक सेन्सर, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) आणि वाहनांचे क्रमांक ओळखणारे एआयने विकसित कॅमेरे वापरले जाणार आहेत. वाहन टोल पॉइंटवरून जाताच त्याची ओळख पटवून टोल व्यवहाराची नोंद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली जाईल. त्यामुळे टोल वसुलीसाठी वाहन थांबविण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच टोल व्यवहारांची अचूक नोंद ठेवणेही शक्य होणार आहे.
दिल्लीच्या सीमेवरील टोलनाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, वाहनांचा खोळंबा टाळणे आणि इंधनाचा अनावश्यक वापर रोखणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रणासाठी या यंत्रणेसोबत इतर उपाययोजनांचीही आवश्यकता राहणार आहे. एमएलएफएफ प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दिल्लीच्या प्रवेशद्वारांवरील वाहतुकीचे चित्र बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.