राष्ट्रीय

कॅनडास्थित उद्योगपतीला हेरगिरी प्रकरणात अटक; सीबीआयची कारवाई

मोहन कारंडे

नवी दिल्ली : संरक्षण विभागात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी कॅनडास्थित उद्योगपती राहुल गांगल याला अटक केली आहे. सीबीआयने याआधी पत्रकार विवेक रघुवंशी याला अटक केली होती. पत्रकार विवेक रघुवंशी याच्याकडून आरोपी राहुल गांगल याला संरक्षण आणि सशस्त्र दलांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पुरवली जात होती.

आरोपी राहुल गांगल याने 'डिफेन्स डीलर' म्हणून काम केले असून, तो जर्मनीस्थित कन्सल्टन्सी फर्म 'रोलँड बर्जर' संस्थेशी संबंधित आहे. आरोपी गांगल हा मूळचा भारतीय नागरिक असून, त्याने 2019 मध्ये कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. गेल्या आठवड्यात तो भारतात आला होता. आज त्याला अटक केली, अशी माहिती सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिली. आरोपी गांगल याला विशेष न्यायालयाने चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

सीबीआयने मे महिन्यात माजी नेव्ही कमांडर आशिष पाठक आणि मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर आता राहुल गांगल यालाही अटक केली आहे. माजी नौदल कमांडर आशिष पाठक आणि मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी यांच्यावर संरक्षण विभागाशी संबंधित संवेदनशील माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याचा आणि ती परदेशी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे.

पत्रकार रघुवंशी हा संरक्षण आणि सामरिक घडामोडींवर बातम्या देणार्‍या अमेरिकेतील वेबपोर्टलचा भारतीय पत्रकार आहे. रघुवंशीला अटक करण्यापूर्वी केलेल्या छापेमारीत सीबीआयने अनेक संवेदनशील कागदपत्रे जप्त केली आहेत. रघुवंशी आणि पाठक यांच्यावर ऑफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्टसह हेरगिरीच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT