Pahalgam attack :
संरक्षण मंत्री म्हणून माझी जबाबदारी सशस्त्र दलांसोबत काम करणे आणि भारताविरुद्ध वाईट हेतू असलेल्यांना योग्य उत्तर देणे आहे. देशावर हल्ला करणार्यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे, अशा शब्दांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला आज (दि.४ मे) इशारा दिला. तुम्ही आमच्या पंतप्रधानांना चांगले ओळखता, त्यांची कार्यशैली आणि दृढनिश्चय तुम्हाला परिचित आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, " राजकारण हा शब्द 'राज' आणि 'नीती' या दोन शब्दांपासून बनलेला आहे; परंतु विडंबना अशी आहे की राजकारण या शब्दाचा अर्थ आता हरवला आहे. मला पूज्य संतांचे आशीर्वाद हवे आहेत. भारतीय राजकारणात ते पुन्हा स्थापित करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.
या वेळी राजनाथ सिंह म्हणाले की, "एक राष्ट्र म्हणून, आपल्या शूर सैनिकांनी नेहमीच भारताच्या भौतिक स्वरूपाचे रक्षण केले आहे. दुसरीकडे आपल्या ऋषीमुनींनी भारताच्या आध्यात्मिक स्वरूपाचे रक्षण केले आहे. एकीकडे आपले सैनिक युद्धभूमीवर लढतात, तर दुसरीकडे आपले संत जीवनाच्या मैदानावर लढतात. संरक्षण मंत्री म्हणून माझ्या सैनिकांसोबत जवळून काम करणे आणि देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे. आपल्या देशावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना योग्य उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे."
देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यर्शैली माहित आहे. त्यांचा दृढनिश्चय देखील ते ओळखतात. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुम्हाला जे हवे आहे ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नक्कीच होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत संपूर्ण देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य आपल्या सर्व देशवासीयांसमोर ठेवले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी (दि.५) दिल्लीत जपानी संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. दोन्ही बाजू सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना होणार्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि जपानमध्ये जुनी मैत्री आहे. अलिकडच्या काळात भारत आणि जपानमधील संरक्षण देवाणघेवाण मजबूत झाली आहे.