Viral News father last rites online File Photo
राष्ट्रीय

Viral News: 'पैसे पाठवते, अंत्यसंस्कार तुम्हीच करा'; वृद्धाश्रमात वडिलांचा मृत्यू, लेकींनी व्हिडिओ कॉलवरच घेतले अंतिम दर्शन

ज्या मुलींच्या भवितव्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले, ज्यांना शिक्षिका बनवून स्वतःच्या पायावर उभे केले, त्याच तीन लेकींनी वृद्धापकाळात वडिलांना वाऱ्यावर सोडल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Viral News father last rites online

सोनीपत: ज्या मुलींच्या भवितव्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले, ज्यांना शिक्षिका बनवून स्वतःच्या पायावर उभे केले, त्याच तीन लेकींनी वृद्धापकाळात वडिलांना वाऱ्यावर सोडल्याची अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वृद्धाश्रमात आजारी वडिलांना भेटायला तर त्या आल्याच नाहीत; परंतु त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार आणि अस्थी विसर्जनासाठीही वेळ नसल्याचे सांगत एका शिक्षिका असलेल्या लेकीने ऑनलाईन ५,१०० रुपये पाठवून वडिलांचा अंत्यविधी करण् सल्ला दिला. सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात घडलेल्या या घटनेमुळे समाजात निर्माण झालेली नैतिक अधोगती मन सुन्न करणारी आहे.

शिवचरण राम रतन गुप्ता, मूळचे मुंबईचे आणि कापड व्यापारी होते. सुमारे दीड वर्षांपासून सोनीपतच्या पश्चिम राम नगर येथील समाज कल्याण शिक्षा समितीतर्फे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात राहत होते. गुप्ता यांना मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना अनिता, निशा आणि प्रिया अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण देऊन लहानाचे मोठे केले. यातील दोन मुली सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते, त्यानंतर शिवचरण हे पूर्णपणे एकटे पडले होते.

वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २० दिवसांपासून शिवचरण गुप्ता यांची प्रकृती अत्यंत बिघडली होती. याबाबत त्यांच्या मुलींना वेळोवेळी फोनवरून कल्पना देण्यात आली होती. मात्र, तिन्ही मुलींनी विविध कारणे सांगून वडिलांची भेट घेणे टाळले. आजारपणाच्या काळात मुलींनी फोनवर बोलणेही बंद केले होते. अखेर शिवचरण यांचा मृत्यू झाला.

व्हिडिओ कॉलवरून पाहिले अंत्यसंस्कार

शिवचरण यांच्या निधनानंतर वृद्धाश्रम संचालकांनी मुलींशी संपर्क साधून त्या येईपर्यंत मृतदेह ठेवू असे सांगितले. मात्र, "आमच्याकडे वेळ नाही," असे सांगत मुलींनी येण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर वृद्धाश्रमाच्या संचालकांनीच शिवचरण यांच्यावर अंतिम संस्कार केले. यावेळी मुलींनी मोबाईलवर व्हिडिओ कॉलवरून अंतिम दर्शन घेतले आणि अंत्यसंस्काराचे सर्व व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवण्याची मागणी केली.

५१०० रुपये पाठवून आटोपले कर्तव्य

नेपाळमध्ये शिक्षिका असलेली मोठी मुलगी अनिता हिने वृद्धाश्रमाला ५,१०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि सर्व विधी व्यवस्थित उरकून घेण्यास सांगितले. सुरुवातीला मुलींनी अस्थी राखून ठेवण्यास सांगितले होते; परंतु नंतर "वेळ मिळत नसल्याने तुम्हीच गंगेत अस्थींचे विसर्जन करून टाका," असा निरोप दिला.

दुसरी मुलगी निशा उत्तर प्रदेशातील आझमगड येथे तर सर्वात लहान मुलगी प्रिया मुंबईत राहते. ज्या लेकींना भेटण्याची आस उराशी बाळगून शिवचरण यांनी जगाचा निरोप घेतला, त्या एकाही लेकीला वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहावेसे वाटले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT