chhattisgarh dance teacher murder case file photo
राष्ट्रीय

Crime News: अनैसर्गिक संबंध, सतत सेक्सची मागणी आणि ब्लॅकमेलिंग; वैतागलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने डान्स टीचरला संपवले

Chhattisgarh dance teacher murder case: गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या डान्स टीचर सत्यमदास मानिकपुरी हत्या प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chhattisgarh dance teacher murder case

छत्तीसगड: छत्तीसगडमधील गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या डान्स टीचर सत्यमदास मानिकपुरी हत्या प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे. लैंगिक छळ आणि वारंवार होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून १० वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानेच आपल्या डान्स टीचरचा काटा काढला. घटनेच्या ५६ दिवसांनंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय सत्यमदास मानिकपुरी हा कवर्धा येथील एका खासगी शाळेत डान्स टीचर होता. तीन महिन्यांपूर्वी त्याची ओळख या अल्पवयीन विद्यार्थ्याशी झाली होती. यादरम्यान त्यांच्यात अनैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित झाले. मात्र, त्यानंतर शिक्षक सत्यमदास याने विद्यार्थ्यावर वारंवार संबंधांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

ब्लॅकमेलिंगमुळे रचला हत्येचा कट

जेव्हा विद्यार्थ्याने डान्स टीचरच्या मागणीला नकार दिला, तेव्हा शिक्षकाने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली. "तुझे सत्य सर्वांसमोर उघड करेन," असे म्हणत तो विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करू लागला. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकाची हत्या करण्याचा कट रचला.

शिक्षकाला भेटायला बोलावले अन्...

१७ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्याने शिक्षकाला व्हॉट्सॲप कॉल करून भेटायला बोलावले. दोघेही लालपूर नर्सरीच्या मागील निर्जन भागात पोहोचले. विद्यार्थ्याने आधीच स्वतःसोबत चाकू लपवून आणला होता. संधी मिळताच त्याने शिक्षकाच्या गळ्यावर वार केले, ज्यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्याने स्वतःचा आणि शिक्षकाचा मोबाईल नदीत फेकून दिला आणि तो आपल्या मूळ गावी सारंगढ-बिलायगड येथे पसार झाला.

५६ दिवसांनी 'असा' झाला खूनाचा उलगडा

घटनेनंतर पकडले जाऊ नये यासाठी या विद्यार्थ्याने इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. 'मोबाईल ट्रॅकिंगपासून कसे वाचायचे' आणि 'गुन्हा करून पोलिसांच्या तावडीतून कसे सुटायचे', अशा गोष्टी तो गुगलवर सर्च करत होता. तब्बल दोन महिने त्याने पोलिसांना चकवा दिला.

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागत नव्हता. मात्र, डान्स टीचर आणि विद्यार्थ्याची ओळख करून देणाऱ्या एका व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली. त्या धाग्यावरून पोलीस आरोपीच्या गावापर्यंत पोहोचले. ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, विद्यार्थ्याने आपला गुन्हा कबूल केला.

"डान्स टीचरला अनैसर्गिक संबंधांचे व्यसन होते. तो अल्पवयीन मुलाकडे वारंवार लैंगिक मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले. आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे."
— धर्मेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक, कवर्धा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT