नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भीतीने थरथर कापत आहेत, अशी बोचरी टीका भाजपने केली आहे. केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा ईडीसमोर उपस्थित राहणे टाळले. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्ला चढवला. केजरीवाल यांच्याकडे ईडीच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, त्यामुळे ते घाबरले आहेत. अशी टीका भाजपने केली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडीने तिसऱ्यांदा समन्स जारी केले होते. मात्र हे समन्स नक्की काय म्हणून पाठवले म्हणत केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहिले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल यांना असे वाटते की, सूडबुद्धीने त्यांना समन्स बजावण्यात आले आहे तर ते न्यायालयात का जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच कुठल्याही यंत्रणेला तपास करण्यासाठी संबंधित व्यक्तीची भूमिका ठरवलीच पाहिजे, असे बंधनकारक नसल्याचेही ते म्हणाले.
जर तपास संस्थांकडे पुरावे आहेत तर तपास करणे हा यंत्रणांचा अधिकार आहे. अरविंद केजरीवाल हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. अरविंद केजरीवाल यांना माहिती आहे की आपणच या गैरव्यवहारांचे प्रमुख सूत्रधार आहोत, म्हणून ते ईडीपासून पळ काढत आहेत. आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणातच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य नेत्यांना देखील यापूर्वी तुरुंगात टाकण्यात आले आहे. एकेकाळी भारतातील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या गप्पा मारणारे केजरीवाल हे राजकारणातील भ्रष्ट दीपक बनले आहेत आणि आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, असा त्यांचा गैरसमज आहे, असाही आरोप गौरव भाटिया यांनी यावेळी केला.
तसेच इंडिया आघाडीतील सर्व नेते एकमेकांना वाचवण्यासाठी सोबत आले आहेत. म्हणून विविध गैरव्यवहारांवर सर्व पक्ष गप्प बसून आहेत. या सर्व पक्षांना परिवारवाद चालवायचा आहे. मात्र भाजप आणि एनडीएसाठी राष्ट्रहित सर्वोपरी असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा :