राष्ट्रीय

crime news | नराधम मुलाने उद्‍ध्वस्त केलं हसतं-खेळतं कुटुंब; आईसह भावंडांची निर्घृण हत्या करून स्वतःच गाठलं पोलीस स्टेशन!

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल, तिहेरी हत्याकांडाने राजधानी दिल्ली हादरली

पुढारी वृत्तसेवा

Delhi Triple murder case

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात आज थरारक घटनेने खळबळ उडाली. एका तरुणाने आपल्याच आईसह, बहीण आणि भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या हत्याकांडानंतर आरोपी तरुणाने स्वतःहून पोलीस ठाणे गाठले. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

मी माझ्या कुटुंबाला संपवले... तरुणाची पोलीस ठाण्यात येऊन कबुली

मिळालेल्या माहितीनुसार, यशवीर असे या आरोपीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास यशवीर लक्ष्मी नगर पोलीस ठाण्यात पोहोचला. "मी माझ्या कुटुंबाला संपवले आहे," असे सांगताच पोलिसांना धक्का बसला. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

नशिली औषधे देऊन गळा दाबला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय यशवीर आपल्या कुटुंबासह मंगल बाजार रोडवर भाड्याच्या घरात राहत होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्याने आई कविता (४६), त्यांची बहीण मेघना आणि अल्पवयीन भाऊ मुकुल (१४) यांचा खून केला. पोलिसांना संशय आहे की, आरोपीने हत्या करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांना जेवणातून काहीतरी गुंगीचे औषध दिले असावे. ते बेशुद्ध झाल्यानंतर त्याने गळा आवळून तिघांचीही हत्या केली. या प्रकरणी जिल्हा पोलीस उपायुक्त अभिषेक धानिया यांनी सांगितले की, "आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. लक्ष्मी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT