आपल्‍या मुलाचा खून करणार्‍या ज्‍योती राठोड न्‍यायालयाने जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  
राष्ट्रीय

crime news | प्रियकरासाठी पाच वर्षांच्या मुलाला छतावरून फेकले; पाषाणहृदयी आईला न्‍यायालयाने सुनावली मरेपर्यंत कोठडी

प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्‍यानंतर उचलले होते टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

illicit relationship crime news

भोपाळ : आपल्या पाच वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याच्या कारणातून ज्‍योती राठोड हिने आपल्‍या पोटच्या गोळ्याचा बळी घेतला होता. समाजमन सुन्‍न करणार्‍या या घटनेतील दोषी आईला भोपाळ न्‍यायालयाने दीड वर्षात भयंकर कृत्‍याची शिक्षा ठोठावली आहे.

मुलाने आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले

मिळालेल्या माहितीनुसार, ज्‍योती राठोड हिचा पती पोलीस दलात कार्यरत आहे. तिचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. २८ एप्रिल २०२३ रोजी ज्योतीचा पाच वर्षांचा मुलगा जतिन याने आपल्या आईला उदयसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.

जतिनला दुसर्‍या मजल्‍यावरुन फेकले

जतिन हे सर्व आपल्या वडिलांना सांगेल, या भीतीने ज्योतीने अत्यंत टोकाचे आणि क्रूर पाऊल उचलले. तिने जतिनला घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावरून खाली फेकून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जतिनचा उपचारादरम्यान २४ तासांच्या आत मृत्यू झाला.

अपघाताचा केला बनाव

सुरुवातीला जतिनचा मृत्यू छतावरून पडून झाल्याचा आणि तो एक अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, गुन्ह्यानंतर १५ दिवसांनी ज्योतीला पश्चात्ताप झाला आणि तिने पती ध्यानसिंग यांच्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली.मुलाच्या मृत्यूनंतर पित्‍या आधीच संशय आला होता. त्यांनी आपल्या पत्नीसोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. तसेच घरातील सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले होते. हे सर्व पुरावे घेऊन त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

प्रियकराची निर्दोष मुक्तता

पोलिसांनी याप्रकरणी ज्योती आणि तिचा प्रेमी उदय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ज्योतीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, उदयविरुद्ध पुरेसे पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

सीसीटीव्‍ही फुटेजमुळे गुन्‍ह्यातील सहभाग स्‍पष्‍ट

"पतीच्या तक्रारीनंतर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर पत्नीचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला होता. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ज्योतीला दोषी ठरवले, तर दुसऱ्या आरोपीला संशयाचा फायदा देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती सरकारी वकील धर्मेंद्र शर्मा यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT