Crime News
लखनौ : प्रवासादरम्यान अचानक उलटी झाल्याचा बहाणा करून, सहप्रवाशांचे लक्ष विचलित करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या एका आंतरराज्यीय टोळीचा लखनौ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरीची एक भन्नाट आणि धक्कादायक शक्कल पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांनी या टोळीतील सहा महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. (Crime News)
डीसीपी शशांक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अत्यंत पद्धतशीरपणे काम करत असे. टोळीतील एक महिला टार्गेट केलेल्या प्रवाशाला बोलण्यात गुंतवून ठेवत असे. दुसरी महिला अचानक मळमळ होत असल्याचे नाटक करत असे आणि सोबत आणलेल्या दुप्पटा किंवा पॉलिथिन बॅगमध्ये उलटी करण्याचे नाटक करत असे. या किळसवाण्या प्रकारामुळे आणि गोंधळामुळे जेव्हा इतर प्रवासी दुसरीकडे वळत असत किंवा मदतीसाठी पुढे येत असत, तेव्हा तिसरी महिला पीडितेच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मंगळसूत्र किंवा लॉकेट चपळाईने हिसकावत असे. चोरीचा माल लगेचच दुसऱ्या साथीदाराकडे सोपवून आजारी असल्याचा बहाणा करत, टोळीतील सर्व महिला पुढच्या स्टॉपवर घाईघाईने उतरून पसार होत असत. चोरी झाल्याचे पीडितेला समजण्यापूर्वीच त्या गायब झालेल्या असायच्या.
२७ ऑक्टोबर आणि त्यानंतर दोन दिवसांनी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनंतर पीडित महिलांनी गोमतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कथौता क्रॉसिंग आणि विराट क्रॉसिंग परिसरात झालेल्या या घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी विराट क्रॉसिंगजवळ सापळा रचून या सहा महिलांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
लखनऊ, मऊ आणि चंदौली येथे अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा संशय आहे की ही टोळी संपूर्ण उत्तर प्रदेशात कार्यरत आहे.