Lover Couple Murder in uatter pardesh
मुरादाबाद: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात प्रेमी युगुलाची हत्या करून त्यांचे मृतदेह नदीकाठी पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाकबडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी सब्जीपूर गावात ही थरारक घटना घडली. दोन वेगवेगळ्या समुदायातील तरुण-तरुणीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रविवारी रात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणासह तरुणीचीही तिच्या कुटुंबीयांनी लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
रिपोर्टनुसार, अरमान (२७) हा रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास त्याची प्रेयसी काजल (२०) हिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी काजलचे तीन भाऊ, आई आणि वडिलांनी दोघांना रंगेहाथ पकडले. संतापलेल्या कुटुंबीयांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. डोक्यात फावडे मारून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रात्रीच दोन्ही मृतदेह गोणीत भरून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गागन नदीच्या पात्रात खड्डा खोदून गाडून टाकले.
आरोपींनी ही हत्या इतक्या थंड डोक्याने केली की, कोणालाही संशय येऊ दिला नाही. रविवारी रात्री हत्या केल्यानंतर घरातील रक्ताचे डाग धुवून पुरावे नष्ट केले गेले. विशेष म्हणजे, जणू काही घडलंच नाही, असा बनाव करत सोमवारी सकाळी घरातील सर्वजण आपापल्या कामावर निघून गेले. मुलीचा भाऊ राजाराम गवंडी कामावर गेला, तर त्याची पत्नी बटाटे काढायला शेतात गेली. आई उसाच्या कापणीला गेली आणि वडीलही दुसऱ्या घरी निघून गेले. तीन दिवस शेजाऱ्यांना या भीषण कृत्याचा पत्ताही लागला नाही.
अरमान बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील मो. हनीफ यांनी पोलिसांत दिली. त्यांनी शेजारील कुटुंबावर संशय व्यक्त केला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तरुणीच्या वडिलांना व भावांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. प्रकरण दोन वेगवेगळ्या समुदायांशी संबंधित असल्याने गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि पीएसी (PAC) तैनात करण्यात आली आहे.
मृत अरमान हा गेल्या चार वर्षांपासून दुबईत फरशा बसवण्याचे काम करत होता. चार महिन्यांपूर्वीच तो भारतात परतला होता. घरच्यांनी त्याला पुन्हा दुबईला जाण्याचा आग्रह धरला होता; परंतु त्याने मुरादाबादमध्येच काम सुरू केले होते. दरम्यान, "माझ्या भावाला बहाण्याने बोलावून त्याची हत्या करण्यात आली आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी," अशी मागणी अरमानच्या बहिणीने केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.