'ज्याला जिथून निवडणूक लढवायची आहे, त्याने लढवावी'; पत्नी हसीन जहाँच्या आव्हानावर मोहम्मद शमीने सोडले मौन file photo
राष्ट्रीय

'ज्याला जिथून निवडणूक लढवायची आहे, त्याने लढवावी'; पत्नी हसीन जहाँच्या आव्हानावर मोहम्मद शमीने सोडले मौन

मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असून, त्यांचे डिपॉझिटही जप्त होईल," असेही हसीन जहाँ यांनी म्हटले आहे.

पुढारी वृत्तसेवा

cricketer shami breaks his silence on wife hasin jahan decision contest elections let her contest from wherever wants

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा जयंत चौधरी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर शमीच्या पत्नीने त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. हसीन जहाँ यांच्या या वक्तव्यानंतर मोहम्मद शमीने मौन सोडले असून, यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पत्नी हसीन जहाँ यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर अखेर क्रिकेटपटू मोहम्मद शमीने मौन सोडले आहे. तो म्हणाला, "ज्याला जिथून निवडणूक लढवायची आहे, त्याने लढवावी. आम्हाला त्याबाबत कोणताही आक्षेप नाही. हे खुले मैदान आहे." मात्र, स्वतःच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीबाबत त्याने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

विशेष म्हणजे, गेल्या सप्टेंबर महिन्यात क्रिकेटपटू मोहम्मद शमीने राष्ट्रीय लोकदलाचे (रालोद) राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांची भेट घेतली होती. स्वतः जयंत चौधरी यांनी या भेटीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शमी अमरोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, याच काळात त्यांच्या पत्नी हसीन जहाँ यांनीही उघडपणे आपली भूमिका मांडली. शमी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कुठूनही निवडणूक लढवत असेल, तर आपणही त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शमी किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्याचा पराभव निश्चित करणे, हाच आपल्या निवडणूक लढवण्यामागील उद्देश असल्याचे हसीन यांनी सांगितले होते.

मात्र, त्यानंतर शमीचे मोठे बंधू हसीब अहमद यांनी जयंत चौधरी यांच्यासोबत झालेली शमी यांची भेट ही कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सध्या शमी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य निवडणूक लढवण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर स्वतः शमी यांनी मौन बाळगले होते.

पत्नीच्या घोषणेवर मोहम्मद शमी काय म्हणाला?

आता मोहम्मद शमीने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. उत्तराखंडमधील रुडकी येथे खानपूरचे आमदार उमेश कुमार यांच्यासोबत असताना शमीने काही दिवसांपूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हसीन जहाँ यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेबाबत विचारले असता शमी म्हणाला, "ज्याला निवडणूक लढवायची आहे, त्याने लढवावी. आम्हाला कोणताही आक्षेप नाही. हे खुले मैदान आहे."

मात्र, यावेळीही त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणताही सदस्य निवडणुकीच्या राजकारणात उतरणार असल्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत किंवा घोषणा केली नाही. त्यामुळे शमीच्या राजकीय प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आणखी काही दिवस उधाण येण्याची शक्यता आहे.

शमीनंतर भाऊ हसीब यांनीही घेतली जयंत चौधरी यांची भेट

मोहम्मद शमी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य अमरोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना गुरुवारी आणखी उधाण आले. शमी याच्यानंतर आता त्यांचे भाऊ हसीब अहमद यांनीही दिल्लीत राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख चौधरी जयंत सिंह यांची भेट घेतली आहे.

या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे शमी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. मात्र, हसीब अहमद यांनी सध्या ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे सांगितले असले, तरी निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारलेली नाही.

हसीन जहाँ काय म्हणाल्या?

या संदर्भात क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ म्हणाल्या, "शमी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची माझ्याविरोधात निवडणूक लढवण्याची पात्रताच नाही. मी घोषणा केल्यानंतरच ते निवडणूक लढवण्याची आणि आमदार होण्याची आपली इच्छा उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत."

"हिंमत असेल तर अमरोहामधून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. येथील लोकांना त्यांचे खरे रूप चांगलेच माहीत आहे. काही दिवसांची खोटी संपत्ती आणि प्रसिद्धीच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असून, त्यांचे डिपॉझिटही जप्त होईल," असेही हसीन जहाँ यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT