पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) नेते, माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
सीताराम येचुरी हे भारतीय राजकारणातील एक मोठे नेते आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आहेत. २०१६ मध्ये राज्यसभा खासदार असताना, येचुरी यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला होता. सीताराम येचुरी हे तमिळ ब्राह्मण कुटुंबातील आहेत. येचुरी १९७४ मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले. एका वर्षानंतर ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे सदस्य बनले. जेएनयू विद्यार्थी असताना आणीबाणीच्या विरोधात निषेध आयोजित केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. आणीबाणी संपल्यानंतर तुरुंगातून सुटलेले येचुरी यांची JNU विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही निवड झाली. सीताराम येचुरी आणि प्रकाश करात यांनी मिळून जेएनयूला डाव्यांचा बालेकिल्ला बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. येचुरी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (SFI) अध्यक्ष देखील होते.