Vice President swearing ceremony
नवी दिल्ली : सी. पी. राधाकृष्णन शुक्रवारी (दि.१२ ) उपराष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राधाकृष्णन यांना शपथ देतील. राष्ट्रपती भवनातील औपचारिक समारंभात हा शपथविधी पार पडेल.
मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६७ वर्षीय राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. दरम्यान, २१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पराभूत करून सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले. आतापर्यंत सी. पी. राधाकृष्णन यांच्या राजकीय प्रवासाचा मागोवा.
देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. एकूण ७६८ खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात ७ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यापैकी बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले होते.