महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. (file photo)
राष्ट्रीय

Vice Presidential Election | सी. पी. राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल, PM मोदी पहिले प्रस्तावक, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी काय आहेत नियम?

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला

पुढारी वृत्तसेवा

Vice Presidential Election

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी (दि.२० ऑगस्ट) एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री जेपी नड्डा यांच्यासह एनडीएचे खासदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी त्यांचे पहिले प्रस्तावक बनले आहेत.

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी पीएम मोदींची सदिच्छा भेट घेतली होती. रविवारी संध्याकाळी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सी.पी. राधाकृष्णन यांना पंतप्रधानांनी याआधीच शुभेच्छा दिल्या आहेत. सी. पी. राधाकृष्णन यांचे दीर्घकाळ सार्वजनिक क्षेत्रात काम आहे. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव आपल्या देशाला समृद्ध करेल. ते पुर्ण समर्पणाने आणि दृढनिश्चयाने देशाची सेवा करत राहोत, अशा खास शब्दांत पीएम मोदींनी भावना व्यक्त केल्या होत्या.

तर दुसरीकडे 'इंडिया आघाडी'कडून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपतीपदाचे अधिकृत उमेदवार आहेत. यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी असा थेट सामना होईल.

उमेदवारीसाठी काय आहेत नियम?

निवडणूक लढवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किमान २० संसद सदस्यांना प्रस्तावक म्हणून आणि किमान २० संसद सदस्यांना समर्थक म्हणून नामनिर्देशित करावे लागते. उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारीसाठी १५ हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक अधिकारी अर्जाची छाननी करतात आणि पात्र उमेदवारांचा नावांचा मतपत्रिकेत समावेश केला जातो.

एनडीएचे पारडे किती जड?

उपराष्ट्रपती पदासाठी दोन्ही सभागृहातील मिळूण एकूण ७८६ खासदार मतदानात सहभागी होतील. यात राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार, काही अपक्ष खासदार आणि कोणत्याही आघाडीत नसलेले खासदार सुद्धा आहेत. लोकसभेतील एकूण ५४२ खासदारांपैकी सत्ताधारी एनडीएकडे २९३ खासदार आहेत तर विरोधी पक्षांकडे एकूण २३४ खासदार आहेत. लोकसभेत १५ खासदार हे कोणत्याही आघाडीचा भाग नाहीत अथवा अपक्ष आहेत. राज्यसभेत नामनिर्देशित खासदारांसह सध्या एकूण खासदारांची संख्या २४० आहे. यामध्ये सत्ताधारी एनडीएकडे १३० तर विरोधकांकडे ११० खासदार आहेत. दोन्ही सभागृह मिळून सत्ताधारी एनडीएकडे ४२३ तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे ३४४ खासदार आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी ३९४ मतांची गरज आहे. सत्ताधारी एनडीएकडे ३९४ पेक्षा जास्त संख्या आहे. त्यामुळे एनडीएचे पारडे जड आहे.

दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये तमिळनाडूत सत्ताधारी असलेल्या द्रमुकचे लोकसभेत २२ आणि राज्यसभेत १० असे एकूण ३२ खासदार आहेत. आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी तेलगू देसम पक्षाचे लोकसभेत १६ आणि राज्यसभेत २ असे एकूण १८ खासदार आहेत. तेलंगणामध्ये सत्ताधारी काँग्रेसचे लोकसभेत ८ तर राज्यसभेत २ असे एकुण १० खासदार आहेत आणि भारत राष्ट्र समितीचे राज्यसभेत ४ खासदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT