पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सर्वत्र कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. यामुळे ( Covid-19 ) कोरोना प्रतिबंधक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. यानंतरही देशभरात सलग दोन आठवडे रुग्णांची संख्या कमीच राहिल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मागील आठवड्यातील (४ ते १० एप्रिल) रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता हरियाणा, दिल्ली आणि गुजरातमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.
देशातील सर्वच राज्यात काेराेना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. देशभरात मागील आठवड्यात ७ हजार १०० नवे रुग्ण आढळले. ही आकडेवारी मागील दोन वर्षांमधील सर्वात कमी आहे. मात्र दिल्ली आणि हरियाणामधील रुग्णांची वाढती संख्या सतर्कता वाढविण्याचा इशारा देत आहे.
दिल्लीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत २६ टक्के वाढ नोंदली गेली आहे. राजधानीत आठवड्यात ९४३ नवे रुग्ण आढळले. दिल्लीतील दैनंदिन संक्रमणाचा दर हा १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. हरियाणातही ५१४ नवे रुग्ण आढळले. मागील आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत ही वाढ ५० टक्के आहे. मागील तीन दिवसांमध्येही गुजरातमध्येही नवे ११४ रुग्ण आढळले आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत अनुक्रमे ८, ४ आणि १२ टक्के घट नोंदली गेली आहे.
हेही वाचा :