Covid 19 cases in India
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे (Covid-19) ६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाची एकूण सक्रिय रुग्णसंख्या ४,०२६ वर पोहोचली आहे. आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत (मंगळवारी सकाळी ८ पर्यंत) पाच लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. यात महाराष्ट्रात २, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना आधीपासून आरोग्यासंबंधित समस्या होत्या.
केरळमध्ये सर्वाधिक १,४३५ रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात सध्या ४९४ रुग्ण आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
केरळमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, गंभीर स्वरुपाचा न्यूमोनिया आणि श्वसनाशी संबंधित आजार (ARDS) असलेल्या ८० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली. महाराष्ट्रात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात मधुमेहाने त्रस्त असलेल्या एका ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दुसऱ्या एका ७३ वर्षीय महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. तिचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे नवे संक्रमण NB.1.8.1 या सब- व्हेरिएंटशी संबंधित आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने पुष्टी केली आहे की, जरी हा नवीन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. यामुळे ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, शरीरदुखी, फ्ल्यू आणि भूक न लागणे आदी लक्षणे दिसून येतात.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना घाबरू जाऊ नका, असे आवाहन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.