Tvisha Sharma death case
भोपाळ न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तींची सून ट्विशा शर्मा हिच्या मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या 'एम्स' (AIIMS Delhi) हॉस्पिटलमध्ये दुसरे शवविच्छेद करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.मात्र, मृतदेह दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याबाबत चिंता व्यक्त करत कोर्टाने पोलीस आणि वैद्यकीय प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
ट्विषा शर्मा हिचा मृतदेह १२ मे च्या रात्री भोपाळच्या कटारा हिल्स भागातील तिच्या सासरच्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत सापडला होता.यानंतर पोलिसांनी तिचे पती वकील समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग (निवृत्त न्यायाधीश) यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. १९ मे रोजी दाखल केलेली नवीन शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीची याचिका फेटाळताना न्यायालयाने मृतदेह सुरक्षित ठेवण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ट्विशा मृतदेह १३ मे पासून भोपाळच्या 'एम्स' (AIIMS Bhopal) शवागारात ठेवण्यात आला आहे.
न्यायालयाने कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या प्रभारींना मध्य प्रदेशातील आणि इतर महानगरांमधील वैद्यकीय संस्थांकडून कमी तापमानात मृतदेह सुरक्षित ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे का, याची लेखी माहिती त्वरित गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयात सादर केलेल्या पोलीस अहवालानुसार, ट्विशाचा मृतदेह सध्या भोपाळ एम्समध्ये उणे ४ डिग्री सेल्सिअस तापमान (-4°C) असलेल्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने कोर्टाला सांगितले की, मृतदेह दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी उणे ८० डिग्री सेल्सिअस (-80°C) तापमानाची आवश्यकता असते, जी सुविधा सध्या भोपाळमध्ये उपलब्ध नाही.
नोएडामध्ये राहणाऱ्या ट्विशाच्या कुटुंबीयांनी तपासात त्रुटी असल्याचा आणि हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करत दिल्ली एम्समध्ये दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. कुटुंबाचा दावा आहे की, ट्विषाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी एफआयआर नोंदवण्यात आला आणि पहिल्या शवविच्छेदनादरम्यान गळफासासाठी वापरलेले साहित्य फॉरेन्सिक टीमला पुरवण्यात आले नाही.
या आठवड्याच्या सुरुवातीला भोपाळ पोलिसांनी ट्विशाच्या कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली होती आणि मृतदेह खराब होण्याची (Decomposition) भीती व्यक्त केली होती. ट्विषाचे वडील नविनिधी शर्मा यांना पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी म्हटले होते की, भोपाळ एम्समध्ये मृतदेह जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. उणे ४ अंश सेल्सिअसवर मृतदेह फार काळ टिकणार नाही, त्यासाठी उणे ८० अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. पोलिसांचा दुसऱ्या शवविच्छेदनाला विरोध नाही, मात्र मृतदेह आधीच अनेक दिवस शवागारात असल्याने काळजी व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणात हुंडाबळी, शारीरिक छळ आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान, सासू गिरीबाला सिंग यांनी कुटुंबाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. एफआयआर नोंदवण्यास झालेला उशीर आणि तपासाच्या पद्धतीवर पीडितेच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे मध्य प्रदेशात या प्रकरणाने मोठे लक्ष वेधून घेतले आहे.