काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर Pudhari Photo
राष्ट्रीय

विधानसभा निवडणुकीची काँग्रेसची रणनिती ठरली?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.25) दिल्ली दौऱ्यात त्यांनी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि इतर सह प्रभारींसोबतही त्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत चर्चा झाली. याचा आढावा त्यांनी काँग्रेस अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत सादर केला. एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या रणनितीसंदर्भात नाना पटोलेंचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातो.

गेले काही दिवस महाराष्ट्रात काँग्रेसच्या विभागनिहाय आढावा बैठका सुरू होत्या. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि त्या त्या विभागातील प्रमुख नेते या बैठकांना उपस्थित होते. या आढावा बैठका संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर आहेत. आढावा बैठकांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष राज्यात कोणत्या जागांवर मजबूत आहे आणि किती जागा लढवू शकतो, याबाबतची माहिती महाराष्ट्र काँग्रेसने तयार केली आहे. त्यांनतर दिल्लीत या माहीतीवर सर्वप्रथम रमेश चेन्नीथला, नाना पटोले आणि इतर तीन सहप्रभारी यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा तपशील नाना पटोलेंनी काँग्रेस अध्यक्षांना कळवल्याचे समजते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला अवकाश असताना काँग्रेस मात्र विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटून तयार आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तयारीला वेग

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे प्रमुख पक्ष एकत्र आहेत. काँग्रेसने निवडणुकीत किती जागा लढवाव्या याबद्दल काँग्रेसने आपला आक़डा जवळजवळ ठरवला आहे. त्यानंतर काँग्रेस तातडीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह चर्चा करणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तयारीला वेग घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT