Shashi Tharoor on RSS
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपला राज्यघटनेऐवजी मनुस्मृती हवी आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्वीटवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधी यांच्या टीकेवर असहमती दर्शवती आता संघाची भूमिका पाहणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये माध्यमांशी बोलताना शशी थरुर म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेली टीका ही ऐतिहासिकदृष्ट्या केलेल्या विधानावर आधारित आहे. राज्यघटना स्वीकृतीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक गोळवलकर यांच्यासह काहींनी म्हटलं हाते की, राज्यघटनेतील सर्वात मोठी त्रुटी ही आहे की, त्यात मनुस्मृतीमधील काहीही समाविष्ट नाही. परंतु, मला वाटते की, संघ आता त्या विचारांपासून खूप पुढे गेला आहे.
राहुल गांधी यांचे विधान ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आहे; परंतू आजच्या काळातही संघाची तीच भावना आहे का, याचे उत्तर देण्यासाठी स्वत: संघानेच देणे योग्य राहिल, असेही यावेळी थरुर यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर का राबवले, याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले होते. यामध्ये शशी थरुर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. अमेरिकेसह मोठ्या देशांमध्ये थरुर यांनी भारताची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्याचबरोबर त्यांनी भाजप नेतृत्त्वाखालील सरकारचे कौतूकही केले. यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी शशी थरुर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शशी थरुर भारतात परतल्यानंतर थेट पराराष्ट्र मंत्री होतील, अशी बोचरी टीकाही काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थरुर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटलं होतं की,पक्षासाठी देश प्रथम आहे, परंतु काही लोकांसाठी मोदी प्रथम आहेत. यानंतर शरुर यांनी एक पोस्ट शेअर केली होती. " भरारी घेण्यासाठी परवानगी मागू नका. पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाच्या मालकीचे नाही," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होते. तसेच यावेळी त्यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर टीका करणारी पोस्ट शेअर केल्या प्रकरणी जाहीरपणे बोलण्यास नकार दिला. मी येथे राजकीय मुद्द्यांमध्ये पडणार नाही. जर चर्चा करण्यासारखे काही मुद्दे असतील, तर त्यावर खासगीत चर्चा केली जाईल आणि वेळ आल्यावर मी ते निश्चितच करेन, असेही थरुर यांनी स्पष्ट केले.