आसाममधील श्रीभूमि जिल्ह्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात 'आमार सोनार बांग्ला' हे गीत गायले गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. 
राष्ट्रीय

Anthem Row : काँग्रेसच्या कार्यक्रमात बांगलादेशचे 'राष्ट्रगीत'!; भाजपचा हल्लाबोल

श्रीभूमि जिल्ह्यातील प्रकाराने आसाममधील राजकीय वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

Congress Event Bangladesh National Anthem

गुवाहाटी : आसाममधील श्रीभूमि जिल्ह्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात 'आमार सोनार बांग्ला' हे गीत गायले गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले हे गीत बांगलादेशचे राष्ट्रगान (National Anthem) देखील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होताच भाजपने काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, या कृतीमुळे 'ग्रेटर बांगलादेश'चा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्‍यान, या संपूर्ण वादावर काँग्रेसने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपचा गंभीर आरोप

आसाम भाजपने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला. "काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने एक नकाशा जारी केला होता, ज्यात ईशान्य भारताचा (Northeast India) काही भाग समाविष्ट करण्यात आला होता, आणि आता काँग्रेस त्याच देशाचे राष्ट्रगान आसाममध्ये गात आहे. ज्यांना हा अजेंडा समजत नाही, ते एकतर आंधळे आहेत किंवा या षडयंत्रात सामील आहेत," अशा तिखट शब्दांत भाजपने काँग्रेसवर आरोप केला.

काँग्रेसचा उद्देश 'ग्रेटर बांगलादेश'चा मार्ग सुकर करणे

आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनीही काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेस पक्षाने "बेकायदेशीर मियाँ घुसखोरांना" दीर्घकाळापासून संरक्षण दिले आहे, जेणेकरून व्होट बँकच्या राजकारणातून राज्याची लोकसंख्या बदलता येईल. "आता हे स्पष्ट झाले आहे की काँग्रेसचा उद्देश 'ग्रेटर बांगलादेश'चा मार्ग सुकर करणे हा आहे," असे सिंघल म्हणाले. दरम्‍यान, श्रीभूमि, याला पूर्वी करीमगंज म्हटले जात होते, हा भाग बांगलादेशच्या सीमेला लागून आहे आणि तो बराक व्हॅलीचा हिस्सा आहे. या भागात बांगला भाषिक लोकांची संख्या मोठी आहे.

बांगलादेशचे 'राष्ट्रगीताचा इतिहास आणि महत्त्व

'आमार सोनार बांग्ला' हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ मध्ये लिहिले होते, जेव्हा इंग्रजांनी बंगालची पहिली फाळणी केली होती. त्या वेळी हे गीत बंगालच्या एकतेचे आणि वसाहतवादी धोरणाच्या विरोधाचे प्रतीक बनले होते. १९११ मध्ये जेव्हा फाळणी रद्द झाली, तेव्हा या गीताने लोकांमध्ये सामायिक ओळख आणि अस्मितेची भावना अधिक दृढ केली.भारत विभाजनानंतर, बंगालचा मुस्लिम बहुल भाग पाकिस्तानमध्ये गेला, ज्याला 'पूर्व पाकिस्तान' म्हटले गेले.या भागातील बहुतांश लोकसंख्या बांग्ला भाषिक होती, तर पश्चिम पाकिस्तानमध्ये पंजाबी भाषिक लोकांचे वर्चस्व होते.१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानने स्वतःला पाकिस्तानपासून स्वतंत्र घोषित करून 'बांगलादेश' या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली.बांग्ला अस्मिता आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून बांगलादेशने या गीताची निवड आपले राष्ट्रगान म्हणून केली.

घुसखोरी आणि लोकसंख्येचा मुद्दा

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील हिंसक संघर्षामुळे लाखो बांगलादेशी नागरिक भारतात स्थायिक झाले. आसामची सीमा बांगलादेशला लागून असल्यामुळे बांगलादेशी निर्वासितांच्या बेकायदेशीर प्रवेशाचा मुद्दा राज्यात नेहमीच चर्चेत राहिला आहे.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी यापूर्वी अनेकदा दावा केला आहे की बांगलादेशी घुसखोरीमुळे आसामची डेमोग्राफी (हिंदू-मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण) बदलली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT