Rahul Gandhi News
संसदेच्या अधिवेशनात झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. Pudhari File Photo
राष्ट्रीय

Rahul Gandhi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेसची नाराजी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात गुरूवारी (दि.२७) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषण केले आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना संबोधित केले. राष्ट्रपतींच्या या भाषणावर काँग्रेसने मात्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपतींचे भाषण राजकीय संदर्भासह होते, असा आरोप काँग्रेसने यावेळी केला.

या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींसह खासदार शशी थरूर, सुप्रिया सुळे, डिंपल यादव, गौरव गोगई, मिसा भारती आदी खासदार उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन राष्ट्रपतींचे भाषण हे राजकीय संदर्भ असलेले भाषण होते, असे काँग्रेससह इंडिया आघाडीने म्हटले आहे.

याबद्दल बोलताना काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, आज लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना अधिकृतरित्या विरोधी पक्षनेते घोषित केले. त्यानंतर राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांची सौजन्य भेट घेतली. यावेळी इंडिया आघाडीचे खासदारही उपस्थित होते. या भेटीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासह संसदीय कामकाजाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रपती ज्या बोलल्या ते टाळता येण्यासारखे होते. त्याला राजकीय संदर्भ होता आणि तो टाळता येण्यासारखा होता.

दरम्यान, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात बोलताना देशात ५० वर्षांपूर्वींची आणीबाणी यासह विविध मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारचे त्यांनी कौतुक केले तसेच पेपरफुटी, आगामी अर्थसंकल्प, देशाची अर्थव्यवस्था, महिला, गरीब, युवा शेतकरी यांना सक्षम करणे,” अशा विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले होते.

SCROLL FOR NEXT