Pahalgam Terrorist Attack
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावं, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पंतप्रधानांना अधिकृत पत्रही पाठवले आहे.
राहुल गांधींनी पत्रात म्हटलं आहे की, "देशात दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि या संकटाच्या काळात एकजूट दाखवण्यासाठी संसद हे महत्त्वाचं व्यासपीठ ठरू शकतं. संसदेमध्ये सरकारने आपली सुरक्षा नीती, उपाययोजना यावर चर्चा करावी आणि संपूर्ण देश एकत्र उभा आहे, हे दाखवावं." काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनीही असाच सूर आळवला आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात, "या क्षणी देशाला सर्वाधिक एकतेची गरज आहे.
संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून आपला सामूहिक निर्धार, इच्छाशक्ती आणि देशासाठीची बांधिलकी जगापुढं ठळकपणे दिसेल. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर अशा पावलं उचलणं गरजेचं आहे."
दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना विनंती केली आहे की, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असताना राजकारणापलीकडे जाऊन सर्व पक्ष एकत्र यावेत आणि संसदेच्या माध्यमातून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय घ्यावेत.